खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे कारागृहातून पलायन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी महेश उर्फ बाळू शिवाजी चव्हाण याने लोखंडी पट्टीच्या गेटवरून उडी मारून सोमवारी (दि.१८) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पलायन केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विसापूर कारागृहातील कर्मचारी पोहेकॉ. जगन्नाथ भोसले हे सोमवारी सकाळी ड्युटीवर होते. सकाळी सहा वाजता त्यांनी आरोपींना नाश्त्यासाठी बाहेर काढले. तेव्हा सदर आरोपीने चहा-नाष्टा घेतला आणि बंदी बराकच्या पूर्व बाजूस तो टॉयलेटसाठी गेला. तेव्हा त्याने तेथील लोखंडी गेटच्या कंपाऊंडवरून उडी मारून पलायन केले. 

Loading...
त्यावेळी स्वयंपाकगृहाजवळ ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपाई गोटीराम पवार यांनी त्या आरोपीस पलायन करताना पाहिले. त्यांनी आवाज दिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत आरोपीचा शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात शोध घेतला. परंतु तो आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्यामुळे मिळून आला नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर खुले कारागृह इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले आहे. या कारागृहात विविध ठिकाणच्या परिसरातील अनेक मोठ्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करून ठेवले जातात. मात्र अलीकडच्या काळात या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याने विसापूर येथील खुले कारागृह आता सुरक्षित आहे का यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.