ना. राधाकृष्ण विखेंच्या मध्यस्थीमुळे निघोजच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्याने निघोज येथील कुकडी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. लवकरच महसूल व पोलीस यंत्रणेच्या मदतीने कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

गेल्या तीन दिवसांपासून निघोज, ता. पारनेर व टाकळीहाजी, ता. शिरूर भागातील शेतकरी मोठया संख्येने निघोज येथील कुकडी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह केला होता. 

Loading...
त्यावेळी ४४ एसकेएफवरील अनधिकृत पाईप काढून टाकण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिले होते. मात्र, पारनेर पोलिसांकडून संरक्षण न मिळाल्याने कारण सांगत अतिक्रमण काढण्यासाठी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांडे वेळ मागितला. 

मात्र, कुकडीचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करण्यासाठी विलंब करत, असल्याचा आरोप करुन शेतकरी पुन्हा उपोषणाला बसले होते. तब्बल तीन दिवस अधिकारी व उपोषणकर्ते यांची चर्चा सुरू होती. 

प्रश्न सुटण्याची अपेक्षा नसल्याने संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ना. विखे पाटील यांची शनिवारी दुपारी भेट घेऊन वराळ यांनी विखे पाटील यांच्यासमोर उपोषणकर्त्यांची बाजू मांडली. 

ना. विखे यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता गणेश नन्नोर यांना फोन करून त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटा, त्यांना मी कारवाई करण्यासाठी सहकार्य करायला सांगतो, अशी ग्वाही विखे पाटील यांनी नन्नोर यांना दिली. नन्नोर यांनी निघोज येथील कुकडी शाखाधिकारी मधुकर दिघे यांना फोन करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यास सांगितले. 

त्याप्रमाणे लेखी आश्वासन दिल्यानंतर शनिवारी रात्री उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी दिघे यांनी उपोषणकर्ते मंगेश वराळ व संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांना लेखी पत्र दिले. या वेळी मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते शिरखुर्मा घेऊन मंगेश वराळ यांनी उपोषण सोडले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.