माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात अडीच लाखांची चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील यशवंत कॉलनीतील बंगल्यातून अज्ञात चोरांनी अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगरमधील यशवंत कॉलनी येथील बंगल्यात शनिवारी (दि.१६) रात्री ११.३० ते रविवारी (दि.१७) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी गडाख यांच्या बंगल्यात प्रवेश करुन डायनिंग हॉल व रुममध्ये सामानाची उचकापाचक केली. 

Loading...
यावेळी तेथे ठेवलेल्या तीन बॅगमधून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम, गडाख यांचे आमदार व खासदार असतानाचे ओळखपत्र, दोन पुस्तके व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड असा ऐवज चोरुन नेला. रविवारी सकाळी याबाबत घरातील काम करणाऱ्या व्यक्तींना कुलूप तोडल्याचे व सामानाची उचका - पाचक झाल्याचे लक्षात आले.

बॅगची पाहणी केली त्यातील रोख रकमेसह इतर ऐवज चोरीला गेल्याचे समजले. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाताच्या ठशांचे नमुने घेणारे पथक व श्वान पथकाने बंगला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी विजय यशवंतराव गडाख यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.