कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने पतसंस्थेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जाची रक्कम देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केल्याने नेवासा तालुक्यातील पाथरवाले येथील शेतकरी राजेंद्र आसाराम गवळी (वय ४०, रा. पाथरवाला) याने पतसंस्थेच्या आवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. कुकाण्यातील नारायणगिरी पतसंस्थेत काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुदाम नारायण खाटीक (रा. सुलतानपूर, ता. नेवासा) व उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र खाटीक (रा. पाथरवाला ता. नेवासा) या दोघांविरुद्ध राजेंद्रच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपाध्यक्ष दत्तात्रय खाटीक यांना अटक करण्यात आली आहे.

Loading...
याप्रकरणी रामेश्वर भाऊसाहेब गवळी (रा. पाथरवाला) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चुलतभाऊ मयत राजेंद्र गवळी हे पत्नी सविता, मुलगा, मुलगी आणि आई, वडील यांच्यासह एकत्र राहात शेती करत होते. ते गावच्या सहकारी संस्थेचेही सदस्य आहेत. सात महिन्यांपूर्वी त्यांनी कुकाण्यातील नारायणगिरी पतसंस्थेकडे साडेपाच लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते.

ते मंजूर करण्यापूर्वीच राजेंद्रच्या शेतीवर बोजा चढविण्यात आला व अनामत रक्कम भरण्याची मागणी पतसंस्थेने केली. यावर राजेंद्र यांनी ७० हजार रुपये भरले होते. कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर अनामत परत देण्याचेही ठरले होते.पतसंस्थेने राजेंद्र यांचे कर्ज दोन महिन्यांपूर्वीच मंजूर केलेले होते.

कर्ज रक्कम साडेतीन लाख रूपयांचा धनादेश पतसंस्थेचा व्यवस्थापक कृष्णा गव्हाणे याने राजेंद्रची सही घेऊन वटविल्यानंतर राजेंद्र कर्जाच्या रकमेची मागणी करत असतांना व्यवस्थापकाने संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षकांनी सांगितल्यावरच 'तुला रक्कम मिळेल' असे सांगितल्याने राजेंद्र हा त्याची रक्कम मिळण्यासाठी सतत या पतसंस्थेत चकरा मारू लागला.

नारायणगिरी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने मंजूर कर्ज प्रकरणाची रक्कम ३ लाख ५० हजार देण्यास टाळाटाळ केल्याचे नमूद केलेले आहे याच आरोपावरून पोलिसांनी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांवर गुन्हा नोंदवला आहे..

राजेंद्र सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पतसंस्थेच्या कुकाण्यातील कार्यालयात आला. कार्यालयातच सोबत आणलेली विषाची बाटली काढत त्याने ती पिऊन घेतली. त्यास नगरच्या सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.

राजेंद्र मयत झाल्याचे कळताच पाथरवाला येथील मोठा जमाव कुकाणा पोलिस दूरक्षेत्रासमोर जमला. पोलिसांनी राखीव पोलिस दलाच्या दोन तुकडया पाचारण केल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे ताफ्यासह पाथरवाल्यात तळ ठोकून होते.

राजेंद्र हा सहकारी संस्थेत सदस्य होता. त्याचे राजकीय प्रस्थही वाढत चालले होते, त्यामुळे कर्जप्रकरणी अडचण करून राजेंद्रची अडचण करण्याचा डाव संस्थेच्या उपाध्यक्षकांनी रचला होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे.६ जूनला पतसंस्थेने मंजूर कर्ज रक्कम द्यावी अन्यथा तहसीलच्या आवारात आत्महत्या करणार असल्याचे निवेदन मयत राजेंद्र याने पोलिस यंत्रणेसह सर्वांना दिले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.