दगडू पाटील बडे यांच्या निधनाने वडिलकीचा आधार हरपला - ना. पंकजाताई मुंडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊसतोड कामगारांचे नेते, माजी आमदार दगडू पाटील बडे यांच्या निधनाने आमच्या परिवारातील वडिलकीचा आधार देणारा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असून, त्यांची उणीव आम्हाला सतत भासेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

माजी आमदार दगडू पाटील बडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे आज सकाळी तातडीने मुंबईहून चिंचपूर पांगूळ येथे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झाल्या. सकाळी ११ वा. बडे पाटील यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी श्रध्दांजली अर्पण करतांना त्या बोलत होत्या.
Loading...

बडे पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना ना. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे व बडे पाटील यांच्यात कौटूंबिक नातेसंबंध आहेत, त्यांची मुलगी माझ्या आतेभावाला दिली आहे असे असले तरी हे नातं नंतर झालं त्याआधी त्यांनी राजकारणात एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं होतं आणि मग कौटूंबिक नातं तयार झालं. 

नात्याच्या आधीचं हे नातं निभावण्यासाठी मी इथे आले आहे. त्यांच्या निधनाने मला धक्काच बसला. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी मला वडिलकीचा आधार दिला, एका ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते माझ्या संघर्ष व आनंदात नेहमीच पाठिशी उभे राहिले. 

ऊसतोड कामगारांचे प्रश्न, भगवानगडाचा मेळावा असो की वेळोवेळी आलेल्या निवडणूका असो यात त्यांनी मला चांगल्या सूचना केल्या. त्यांचे व्यक्तिमत्व रूबाबदार तर होतेच शिवाय ते सोज्वळ, शांत व तितकेच शिस्तीचे कडक होते. 

गेल्या काही दिवसात पांडूरंग फुंडकर, भय्यू महाराज व आता बडे पाटील अशी समाजाला योगदान देणारी चांगली माणसे आपल्यातून निघून जात आहेत, हे दुःखदायक आहे, त्यांची उणीव आपणास सतत भासत राहील अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी देखील बडे पाटील यांच्याविषयी यावेळी शोकभावना व्यक्त केल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.