पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्नीचे नाक तोंड दाबून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. डब्ल्यू हुड यांनी आरोपी पती ज्ञानेश्वर बाळू डुकरे (रा. हनुमान वस्ती,ता. पाथर्डी) याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सूनावली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी वकील ॲड. अनिल घोडके यांनी काम पाहिले. 

Loading...
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि. १/९/२०१६ ते दि. २/९/२०१६ या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील अकोला गावचे शिवारात हनुमानवस्ती येथे मयत सावित्रा ज्ञानेश्वर डुकरे ही सासरी नांदत असताना तिचा पती ज्ञानेश्वर बाळू डुकरे याने पत्नी सावित्रा हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन फारकत दे असे म्हणून ती फारकत देण्यास तयार नसल्याने तिचा सतत शाररीक व मानसिक छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ करून दि. १/९/२०१६ रोजी रात्री ज्ञानेश्वर याने सावित्रा हिस नाक तोंड दाबून तीचा श्वास गुदमरून तीला ठार केले.

याबाबत मयत सावित्रा हिची आई सरस्वती पांडुरंग जायभाये हिने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा सहा. फौजदार घनवट यांनी तपास करून पो. नि. पवार यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. डब्ल्यू हुड यांचेसमोर झाली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

त्यात औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल येथील डॉ. गणेश निटुरकर यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर डुकरे याला भादवि ३०२ नुसार दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर आरोपी बाळू डुकरे, बाबुराव बाळू डुकरे व नंदा बाळु डुकरे यांची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.