उसतोडणी कामगारांचे नेते माजी आमदार दगडू बडे यांचे निधन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उसतोडणी कामगारांचे नेते व माजी आमदार दगडु पाराजी बडे (वय - ८१ वर्षे) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शीलाबाई, मुले कल्याण व धनंजय आणि चार मुली असा परिवार आहे.  ऊसतोडणी कामगारांना संघटित करण्याची सुरुवात १९८० साली बडे व माजी मंत्री बबन ढाकणे यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी मतदार संघात कमळ फुलविण्याचे काम पहिल्यांदा दगडु बडे यांनी केले. उपेक्षीत असणाऱ्या तोडणी कामगारांचे संघटन करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचे काम केले. वडगाव येथील बेलपारा मध्यम प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. गावचे पोलिस पाटील पदापासून सुरुवात केली.

Loading...
गावचे सरपंच, सेवा सहकरी संस्थेचे चेअरमन, पंचायत समिती सदस्य, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व विधानसभा सदस्य अशी पदे त्यांनी भूषविली. त्यानंतर सामाजिक कामात सातत्याने पुढे राहणारे बडे यांनी १९९९ साली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी केली.

माजी मंत्री बबन ढाकणे व दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांचा पराभव करुन ते विधानभवनात गेले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे भाचे रमेश कराड व दगडु बडे यांची मुलगी यांचा विवाह झाल्यानंतर मुंडे यांचे ते जवळचे नातेवाईक बनले होते.

बबन ढाकणे यांचे दिवंगत चिरंजीव राजेंद्र ढाकणे यांना बडे यांची मुलगी दिल्याने ते ढाकणेंचे व्याही बनले. बडे यांना शुक्रवारी दुपारनंतर छातीमधे त्रास होवू लागल्याने अहमदनगर य़ेथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

मागील सहा महिन्यांपासून ते आजारीच होते. नगर व पुणे येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. चिंचपूर पांगुळ गावचे सरपंच धनंजय बडे व औरंगाबाद उच्च न्यायालयात वकील असणारे कल्याण बडे हे दोघे त्यांचे मुले आहेत. सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून बडे सर्वांचे दादा होते. दादा या टोपण नावाने त्यांची ओळख होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.