पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवेंना अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे यांना मारहाण प्रकरणात नेवासा पोलिसांनी अटक केली. नारायण भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पालवे यांना नेवासा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. १८ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादीत नारायण भवर यांनी म्हटले, की ते दि. ८ जून २०१८ रोजी नेवासा न्यायालयात आले होते. एका गुन्ह्यात त्यांचे भाऊ बंडू भवर व दत्तात्रय भवर यांचा न्यायालयात जामीन होणार होता. 

यावेळी भवर यांच्या भावांचे ज्यांच्याशी भांडण झाले, ते भारत किसन पालवे, संभाजी किसन पालवे, जंताराम किसन पालवे, राणाप्रताप किसन पालवे (सर्व रा. पांढरी पुल) हेसुद्धा कोर्टात आले होते. कोर्टाचे काम आटोपल्यावर भवर दुचाकीवरून पांढरीपुलकडे जाण्यास निघाले. 

Loading...
दुपारी ४.२० वाजता ते उत्थळ फाट्याजवळ आले असता, पाठीमागून मारुती अल्टो व स्कॅर्पिओ गाड्या त्यांना आडव्या घालण्यात आल्या. भवर यांनी गाडी थांबवताच कारमधून उतरलेल्या भारत पालवे, संभाजी पालवे, जंताराम पालवे, राणा पालवे यांनी शिवीगाळ करून हॉकी स्टिक व लोखंडी दांड्याने मारहाण केली. 

मारहाण केल्यानंतर भवर यांच्याकडील मोबाईल, १२ हजार रुपये रोख व मोटारसायकल काढून घेतली. याप्रकरणी भवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी वरील चारही आरोपींवर भा.दं.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील संभाजी पालवे यांना पोलिसांनी अटक करून काल नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.