सुरक्षारक्षकांना शिवीगाळ; माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी साईमंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ व आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्यावरून माजी नगरसेवक राजेंद्र हरिभाऊ गोंदकर याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

माजी नगरसेवक गोंदकर गुरुवारी साईमंदिर परिसरात काही साईभक्तांना दर्शनासाठी नेत असताना गेटवर संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. दर्शनपासची विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे पास नसल्याने सुरक्षारक्षक समाधान बनकर व प्रकाश कर्पे यांनी त्यास साईमंदिरात जाण्यास मज्जाव केला.

त्यानंतर गोंदकर याने आरडाओरडा करून सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली. ही बाब पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गोंदकरला ताब्यात घेऊन मंदिर परिसरात आरडाओरडा व शिवीगाळ करून शांतता भंग केली.

Loading...
यावरून शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोंदकर यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. शिर्डी पोलिस, साईसंस्थान व शिर्डी नगरपंचायत पॉलिसवाल्यावर संयुक्त कारवाई करत आहे.

पैसे घेऊन दर्शन करून देतो म्हणून साईभक्तांची फसवणूक केली जाते. शंका आल्याने गोंदकर यांच्याबरोबर असलेल्या साईभक्तांना विचारले असता, त्यांनी मी नगरसेवक असून ३०० रुपयांत तुम्हाला साईबाबांचे दर्शन करून देतो, असे सांगितल्यानेे आम्ही गोंदकरबरोबर आलो, असे त्या साईभक्तांनी सांगितले.

मात्र, त्यांनी याबाबत तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ व साईबाबा मंदिर परिसरात आरडाओरडा केल्यावरून माजी नगरसेवक गोंदकर याच्याविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे, असे साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी आनंद भोईटे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.