मतीमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपी दिलीप कराळे (रा. आगडगाव, ता. नगर ) याला दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मतीमंद मुलगी ही तिचे घरी दिवसभर एकटीच असते. तिला बोलता येत नाही व ती मानसिक दृष्ट्या अपंग आहे. या गोष्टीचा आरोपीने गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेमुळे पिडीत मुलगी गरोदर राहिली.

Loading...
त्यानंतर पिडीत मुलीचे आईने आरोपीविरुद्ध संशय व्यक्त केला. यामध्ये पिडीत मुलीच्या जन्मलेल्या बाळाची व आरोपीची डिएनए तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी दिलीप कराळे याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधिक्षक भोईटे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व न्यायाधीश एस. आर. नावंदर यांचेसमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सोलट, डॉ. ए. एन. कराळे, डॉ. अश्विनी सोनवणे, डॉ. विजय गाडे आणि पोलिस उपअधिक्षक भोईटे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने भादविकलम ३७६ (२) नुसार आरोपी कराळे याला दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी पन्नास हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकिल ॲड. अनिल घोडके यांनी काम पाहिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.