श्रीगोंद्यात जमिनीची मोजणी करून देत नसल्याने अधिकार्याला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नातेवाईकांच्या जमिनीची मोजणी करून देत नसल्याने राग अनावर झालेल्या चिखली येथील गणेश भिवसेन झेंडे याने भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भास्कर भांदुर्गे यांना खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भांदुर्गे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी गणेश झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भास्कर भांदुर्गे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी एक वर्षापासून येथे नियुक्‍तीस आहे. घारगाव येथील गट नं. 208 व 224 चे कोर्टवाटप प्रकरणी सुभद्राबाई अर्जुन कळमकर व आणखी एकाने भूमिअभिलेख कार्यालयात 19 जुलै 2016 रोजी मोजणी अर्ज दिला होता. 

Loading...
सदर दरखास्तीविरुद्ध अर्जुन पर्वती कळमकर यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे अपील दाखल केलेले आहे. या प्रकरणात 22 जानेवारी 2018 रोजी औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता मनाई आदेश दिला आहे. 

त्यामुळे सदर मोजणीचे काम स्थगित ठेवले आहे. सुभद्राबाई कळमकर यांचा नातेवाईक गणेश भिवसेन झेंडे (रा. चिखली) भूमिअभिलेख कार्यालयात चौकशीसाठी एक-दोन वेळा आला होता.

उपअधीक्षक भांदुर्गे यांनी फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, गुरुवारी (दि. 14) मी माझे कक्षात कामकाज करीत होतो.मी देवदैठण येथील शरद सुखदेव खेडकर यांच्याशी कामाबाबत चर्चा करीत होतो.

या वेळी माझे सहकारी विजय राठोड, संजय डोळस, बाळू नांगरे, चंद्रशेखर शिंदे, तेजकुमार रोकडे, अविनाश गावडे, प्रवीण बोरुडे, किरण हराळ, कानिफ भापकर व सर्जेराव पोटघन हे माझ्या कार्यालयात उपस्थित होते. 

या वेळी दुपारी एकच्या सुमारास सुभद्राभाई कळमकर यांचा नातेवाईक गणेश झेंडे खोऱ्याचा दांडा घेऊन शिवीगाळ करीत माझ्या कक्षात घुसला. 

सुभद्राबाई कळमकर यांच्या मोजणीला मनाई नसताना तुम्ही समोरील अर्जुन कळमकर यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत, म्हणून माझे नातेवाईकांची मोजणी करून देत नाहीत, असे म्हणून मला हातातील खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

माझ्या कार्यालयात घुसून सरकारी कामात अडथळा आणला. कार्यालयातील सहकाऱ्यांनी मला झेंडे यांच्या तावडीतून कसेबसे सोडविले.

या प्रकरणी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे (वय 50, रा. श्रीगोंदे) यांच्या फिर्यादीवरून गणेश भिवसेन झेंडे (रा. चिखली) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी गणेश झेंडे याला अटक केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.