डॉ.सुजय विखेंच्या उमेदवारी साठी चव्हाण व पवार यांची भेट घेणार - अण्णासाहेब शेलार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेला अच्छेदिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपाच्या सरकारला धडा शिकविण्यासाठी जनता निवडणुकीची वाट पहात आहे. केवळ घोषणाबाजी करण्यात पटाईत असणाऱ्या सरकारला जनताच कात्रजचा घाट दाखविल. काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार असल्याची माहिती इंदिरा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली. 

पाथर्डी येथे इंदिरा काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक अभय आव्हाड यांच्या कार्यालयात झाली. त्यानंतर जनसेवा फाउंडेशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. या वेळी अभय आव्हाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, संभाजी वाघ, प्रतीक खेडकर, पृथ्वीराज आठरे, राजेंद्र तागड, नाशीरभाई शेख, प्रकाश शेलार उपस्थित होते. 

Loading...
पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ इंदिरा काँग्रेस पक्षाला देऊन डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी मिळावी, असा ठराव पाथर्डी तालुका इंदिरा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दक्षिणेतील मंडळी जाणार अहोत.

मात्र, दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेतील, तो निर्णय मान्य करू.चार वर्षांपूर्वी जनतेने भाजपाच्या हाती सत्ता दिली, सरकारचे एकही ठोस काम दिसले नाही. काँग्रेस -राष्ट्रवादीच्या सरकारच्या जुन्या योजनांना नवीन नावे देऊन घोषणाबाजी चालू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकार कमी करून निधीमध्ये कपात केली. 

बोंडअळी अनुदान, कर्जमाफी, काळापैसा बाहेर काढून गरिबांना पंधरा लाख देणार, रोजगार देणार हे सर्व फसवे आहे. शेतकरी व व्यापारी सर्वजण नाराज आहेत. ज़नता निवडणुकीची वाट पहात आहे. सरकारला हद्दपार करून वचपा काढण्याचे काम जनता करील. 

काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दक्षिणेत निवडून येईल, अशा क्षमतेचा उमेदवार सर्व विरोधी पक्षांनी एकत्रीत येऊन द्यावा, यासाठी आमचा पुढाकार राहील. दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना भेटून परिस्थिती सांगू. विरोधी बोलणाऱ्यांवर या सरकारकडून दहशत पसरविली जाते म्हणून सामान्य माणूस सरकारविरोधी बोलत नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.