राज्यातील पहिला घरकुल वंचितांचा प्रकल्प अहमदनगरला होण्याची आशा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत होवून, घरकुल वंचितांची घरे साकारण्यासाठी महाराष्ट्रात हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याकरिता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील म्हाडा कार्यालय व मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता, गृह निर्माण खात्याचे मुख्य सचिव तर संबंधित अधिकार्‍यांची भेट घेवून चर्चा केली. 

या योजनेला संबंधीतांनी हिरवा कंदिल दाखविला असून, गृह निर्माण खात्याचे मुख्य सचिव संजीवकुमार यांनी अहमदनगरला मनपा हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबवून घरकुल वंचितांसाठी अकरा हजार घरांचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली. 

संघटनेच्या शिष्टमंडळाने म्हाडा कार्यालयात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता, म्हाडाचे प्रमुख अधिकारी मिलिंद म्हैसकर व पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख सुनिल साधवाणी यांची भेट घेवून, पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची मागणी करुन, सदर योजनेची माहिती देण्यात आली. 

यावेळी संघटनेचे अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, विवेक धोत्रे उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून साऊथ कोरिया व जपान सारख्या देशांनी दुबळ्या घटकांसाठी घरे उभारुन सदर योजना यशस्वी केल्याचे सांगण्यात आले. मेहेता यांनी या विषयावर सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलविण्याचे आश्‍वासन दिले. 

तर साधवाणी यांनी अहमदनगर मनपाचे पंतप्रधान आवास योजना प्रकल्प अधिकारी मेहेत्रे यांच्याशी चर्चा करुन, महापालिकेने पिंपळगाव माळवी येथील मनपाची जमीन उपलब्ध करुन दिल्यास या प्रकल्पाला सुरुवात करण्याचे सांगितले.

तर मंत्रालयात गृह निर्माण खात्याचे मुख्य सचिव संजीवकुमार यांच्याशी शिष्टमंडळाने अर्धा तास चर्चा केली. संजीवकुमार यांनी अहमदनगरला मनपा हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची तयारी दर्शवली. या योजनेत पडिक जमीनी देणार्‍या शेतकर्‍यांना डेव्हलप झालेल्या जमीनीचा कमर्शिअल प्लॉट, जमीनीच्या प्रमाणात काही विकसीत जमीन परत देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. 

Loading...
ही घरे उच्च तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार बांधण्यासाठी सिंगापुर येथील एजन्सी नेमली जाणार असल्याचे सांगून, या योजनेसाठी येत्या पंधरा दिवसात गृह निर्माण मंत्रालयात प्रस्ताव पाठवून सदर प्रस्ताव कॅबिनेट मध्ये ठेवण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

साडे तीन वषापुर्वी घोषणा झालेली पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी व जागा उपलब्ध नसल्याने ही योजनेला गती मिळाली नाही. ही योजना म्हाडाकडे शासनाने वर्ग केली आहे. घरकुल वंचितांचे घरे होण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा चालू असून, अनेक आंदोलने केली जात आहे. 

संघटनेच्या पाठपुराव्याने हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांची घरे साकारली जाणार असून, राज्यातील हा पहिला प्रकल्प अहमदनगरला होण्याची आशा निर्माण झाली असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.