अॅड. प्रताप ढाकणे यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संघर्षाशिवाय जीवनात काही मिळत नाही. प्रतापराव तुम्ही २१ वर्षांपासून संघर्ष करत आहात, तुम्ही शिवसेनेत या तुमचा वनवास हटवू. योग्य तो सन्मान करू. माझ्याबरोबर या तुमचा वनवास निघून जाईल, असे निमंत्रण विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी देताच अॅड. प्रताप ढाकणे समर्थकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावर ढाकणे यांनी भाष्य टाळले. 

                             

आमदार दराडे यांनी पाथर्डी तालुक्यात शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आमदार दराडे यांनी तालुका दौरा केला. त्यावेळी त्यांचा अॅड. प्रताप ढाकणे यांनी सत्कार केला. त्यावेळी दराडे बोलत होते. या वेळी बाजार समिती सभापती बन्सी आठवे, ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार, डॉ. विनोद गर्जे, 'केदारेश्वर'चे संचालक ऋषिकेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाठ, बाळासाहेब घुले, योगेश रासने, किरण खेडकर, अनिल ढाकणे, सतीश गुगळे, सागर शिरसाठ, कृष्णा आंधळे आदी उपस्थित होते. 
Loading...
आमदार दराडे म्हणाले, राजकीय जीवनासह सर्वच क्षेत्रात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्यातून मोठा झालेला माणूस मागे पडत नाही. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजकारण करताना सर्व स्तरांतील लोकांशी संपर्क येतो. सर्वसामान्य जनता विश्वासाने बरोबर राहिल्याने वाटचाल सुखकर झाली. 

ज्या शिवसेनेने काही वर्षांपूर्वी आपल्याला पराभूत केले. त्याच शिवसेनेने आमदार केले. राजकारणात संयम, शांतता उपयोगात अाणून पुढचा मार्ग निश्चित केला. प्रतापराव माझ्याबरोबर आलात, तर वनवास संपेल, अशी खात्री देतो, असे दराडे म्हणाले. 

दरम्यान, दराडे यांनी ढाकणे यांच्यापुढे ठेवलेल्या प्रस्तावाची 'मातोश्री'वर काही चर्चा आहे, का याबाबत त्यांचे समर्थक माहिती मिळवत आहे. ढाकणे यांनी संपर्क वाढवत पत्नी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, मुलगा ऋषिकेश व ते स्वतः मतदारसंघात संपर्क अभियान राबवण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे आमदार दराडे यांचे निमंत्रण ढाकणे कधी स्वीकारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

सार्वजनिक जीवनात संघर्षच कामाला येतो
१९९९ मध्ये आमदारकीची निवडणूक केवळ ७८ मतांनी हरलो. त्यावेळी बबनराव ढाकणे मंत्रिमंडळात होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख व बबनरावांकडून संघर्षाचा वारसा घेतला. वंजारी समाजात वि. दा. कराड व नरेंद्र दराडे हे दोनच श्रीमंत व्यक्ती आहेत, असे मुंडे नेहमी म्हणायचे. सार्वजनिक जीवनात श्रीमंती, नव्हे तर संघर्ष कामाला येतो, असे दराडे म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.