निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणारच - खा.लोखंडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याचा पाठपुरावा व साईबाबांच्या कृपेने निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली. त्यामुळे २२३२ कोटी रुपये निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन वर्षात निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मिळवून देणारच आहोत, असे प्रतिपादन खा.सदाशिव लोखंडे यांनी केले. 

निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळवून दिल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामस्थांतर्फे खा. लोखंडे तसेच निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दगू माधव दिघे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे, पंढरीनाथ इल्हे, विठ्ठल पोकळे, श्री. थोरे, पं.स. सदस्या आशा इल्हे, शीतल हासे, रणजित दिघे उपस्थित होते.


खा. लोखंडे म्हणाले, कृती समितीचे प्रयत्न व शेतकऱ्यांनी दिलेली साथ यामुळेच प्रश्न सोडविण्यास यश आले. निळवंडे धरणाचे पाणी येईपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवावे. कृती समिती व आपणास साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुखलाल गांगवे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, रमेश दिघे, दत्तू आहेर यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खा. लोखंडे व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आगमन होताच तळेगाव चौफुलीवर फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी खा. लोखंडे व कृती समितीच्या विजयाची घोषणाबाजी करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.