चास शिवारात भिषण अपघातात राळेगण सिध्दीचे काका-पुतण्या ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात पुण्याकडे जाणाऱ्या कारने मालमोटारीस पाठीमागील बाजूने दिलेल्या धडकेत राळेगण सिध्दी येथील प्रशांत गणपत मापारी (२९) व सुमित संदीप मापारी (११) या काका-पुतण्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. यात कार चालक गंभीर जखमी झाला.

प्रशांत मापारी यांचे मोठे बंधू व सुमितचे वडिल संदीप हे जम्मू येथे सीमा सुरक्षा दलात नोकरीस आहेत. महिनाभराची सुट्टी संपवून संदीप रविवारी रात्री ८.३० च्या जम्मू एक्सप्रेसने पुन्हा जम्मूला जाणार होते. त्यांना नगर येथील रेल्वे स्थानकावर सोडून प्रशांत, सुमित व संदीप यांचा मेहूणा भाऊसाहेब कर्डीले हे कारमधून घराकडे परतत होते. 


Loading...
चास शिवारात एका हॉटेलजवळ कारने पुढे चालेल्या मालमोटारीस पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. यात चालकाशेजारील सीटवर बसलेले प्रशांत मापारी यांचा जागीच मृ्त्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सुमितचा नगर येथे उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. 

या अपघातात चालक भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, सोमवारी सकाळी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी राळेगणसिद्धीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जम्मूकडे निघालेले संदीप यांना या अपघाताची माहिती कळवण्यात आल्यानंतर ते भुसावळ येथे उतरून पुन्हा राळेगणसिद्धीकडे परतले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह मापारी परिवाराचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित हाते. या दुर्घटनेमुळे राळेगणसिद्धीत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.