आमदार संग्रामभैय्या जामीन घ्या ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पत्राद्वारे भावनिक आवाहन.


केडगाव हत्यांकाडनंतर गेल्या दीड महिन्याहून अधिक दिवस कोठडीत असलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी जामीन घ्यावा या मागणीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावनिक साद घालत एक पत्र पाठवले आहे,सध्या हे पत्र सोशल मिडीयावर राष्ट्रवादी व आमदार जगताप समर्थक व्हायरल करत आहेत.

तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत जामीन न घेण्याचा पवित्रा आमदार जगताप यांनी घेतला आहे,आमची साद ऐकून तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देताल अशी आशा बाळगत जामीन घ्यावा असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांनी केले आहे

वाचा सोशल मिडीयावर व्हायरल होणारे पत्र -  

प्रति,
मा. आमदार संग्रामभैय्या जगताप


संग्रामभैय्या, तुम्ही नगर शहराचे आमदार असतानाही कोणताही अहंम, अविर्भाव दाखवला नाही. सामान्य माणसांप्रमाणे तुम्ही आमच्याशी एकरूप झालात. त्यामुळेच तुम्ही आम्हा नगरकरांच्या कुटुंबातील सदस्य झालात. आज तुम्ही आम्हा नगरकरांचा श्वास झालात. त्याच जोरावर तुम्ही नगर विधानसभेचे मैदान मारले. त्याचे शल्य ‘त्या’ काळ्या मनाच्या विरोधकांच्या मनात तेव्हापासून ते आजतागायत आहे. पराभव मान्य करण्याची त्याची वृत्तीच नाही.

तुम्ही अनेकदा विकास कामासाठी त्यांना साद घातली पण त्यांनी प्रतिसाद मात्र दिला नाही. नगर शहर विकासाचा अजेंडा तुम्ही राबविला, मात्र त्यांना तो मान्य नाही. त्यामुळेच केडगाव दुहेरी हत्याकांडाचे भांडवल करून त्यांनी कुटनितीने तुम्हाला त्यात अडकविलं. तुम्ही निरपराध आहात याचा आम्हाला विश्वास होताच. नंतर तो पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी दिलेल्या रिपोर्टने सिध्दही केला. विरोधकांच्या कुटनितीचा भांडाफोड तुम्ही नाहीतर पोलीस प्रशासनानेच केला.

एक आमदार काय करू शकतो हे तुम्ही तुमच्या आमदारकीच्या टर्ममधील चार वर्षात नगरकरांना दाखवून दिले, याचा आम्हा नगरकरांना सार्थ अभिमान आहे. मोठ्ठ खेड म्हणून हिणविलं जाणाऱ्या नगर शहराने विकासाच्या दिशेने पाऊल टाकले. तुमच्या याच कार्यकर्तृत्वाला नगरकरांनी उचलून धरलं. नेमकं हेच विरोधकांना खुपलं. तरुणाची माथी भडकावून त्यावर राजकीय पोळ्या भाजणे हा त्यांचा जुना धंदाच.

त्यांना नगरचा विकास व्हावा असं कधी वाटतच नाही. तुम्ही मात्र विकासाचा मुद्दा हातात घेऊन वाटचाल करत राहिलात. २५ वर्षे आमदारकीची टिमकी मिरविणाऱ्या त्या माजी आमदाराला तुमचे विकासाभीमुख नेतृत्व मान्य नव्हतं. समोरासमोर पराभव करता येणार नाही, आपलं राजकारण तिशीतल्या तरुणाने संपविलं. आपला राजकीय उदय पुन्हा नगरच्या पटलावर होणे नाही, हे त्याला माहिती होत, त्यामुळेच त्याने केडगावचे भांडवल पुढे करून हा कुटिल डाव टाकला. 

तुम्ही निरपराध असल्याने तपास होईपर्यंत जामीन घेणार नाही असा ‘पण’ केला. अर्थात त्यामागे तुमचा विश्वास होता व आहे. नगर पोलिसांकडून तपास सीआयडीकडे गेल्यानंतरही तुम्ही तूमचा ‘पण’ कायम ठेवला, त्यामागे तुम्हाला असलेला हा विश्वास कायम असल्याने तुमचा केडगाव प्रकरणाशी संबंध नाही याचा आम्हाला असलेला विश्वास अधिक दृढ झालाय. 

 तपास आता पूर्णत्वाच्या दिशेला गेलाय. तुम्ही कोठेच अपराधी नाहीत, हे नगरकरांसमोर आले. मात्र तुम्हाला संपविण्याची सुपारी घेणाऱ्या त्या माजी आमदाराने राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर (खरे तर दुरूपयोग) करून घेतला. मात्र त्याचा ‘काळा’ चेहरा, त्याची ती स्टंटबाजी आता नगरकरांसमोर आलीयं. श्रीराम येंडे या निष्ठावंत जुन्या मावळ्यांनीही त्याच्या कुटनितीचा बुरखा फाडलाय.

तुम्ही निर्दोष असल्याचं तपास यंत्रणा जाहीर करेल. पण ते जाहीर करेपर्यंत तुम्ही जेलमध्ये राहणं म्हणजे नगर शहराला विकासापासून कोसो मैल मागे गेल्यासारखं आहे. तुमचा ‘पण’ तुमच्यासाठी मोठेपणा असेलही, परंतू नगर शहर विकासाच्या वाटेतील काट्यासारखा तुमचा तो ‘पण’ आम्हा नगरकरांना टोचतो आहे.

भैय्या तुम्ही नगरमध्ये होता तोपर्यत विकास कामांचा नारळ फुटला नाही असा एकही आठवडा गेला नाही. रस्ते,वीज, पाणी या समस्या कायमच्या संपविण्यासाठी तुम्ही त्या दिशेने पाऊल टाकलं. कोणीही प्रश्न घेऊन आला की त्याला करता येईल तितकी मदत तुम्ही करत असल्याचं आम्ही पाहिलयं. तो कोणत्या गावचा, मतदार आहे की विरोधक याचे मोजमाप तुम्ही कधी केल्याचंही आम्ही पाहिलं नाही.

त्यामुळेच नगर शहराचं रुपड पलटु लागलं. नगर विकासाच्या वाटेने धावू लागलं. मात्र तुम्ही केडगाव प्रकरणात विनाकारण जेलमध्ये गेल्यापासून नगर विकासाच्या वाटेत काटे टाकण्याचे काम त्या माजी आमदाराने केलंय. त्याने आम्हा नगरकरांची घुसमट होते आहे ‘त्याला’ तर तुम्ही जेलमध्येच रहावं, हेच हवं होत. मात्र आम्हाला नगरविकासाचा गाडा पुढे नेण्याकरीता तुम्ही हवे आहात. 

तपास यंत्रणा यथावकाश तुम्हाला निर्दोष जाहीर करेल याचा ठाम विश्वास आजही आमच्या मनात कायम आहे. मात्र तुम्ही जो काही ‘पण’ केला त्यानं आमचं, आपल्या नगर शहराचं नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही आमच्यात अर्थात शहरात येणं हेच आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आम्हा नगरकरांची तळमळ, कळकळीची भावना तुमच्यापर्यंत पोहचावी, तुम्ही तुमचा ‘पण’ सोडून आमच्यासाठी जामीन घ्यावा, बाहेर यावं हेच साकड या माध्यमातून आपल्याकडे घालत आहोत. 

आमची साद ऐकून तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देताल यावर आमचा विश्वास आहे. भैय्या तुमचे नगर शहरावर, आमच्यावर खूप प्रेम आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा ‘पण’ बदलताल हा विश्वास मनात ठेवून ‘तुम्ही तुमचा निर्णय बदलाल’ या उत्तराची आशा मनी बाळगून तुमच्या उत्तराची वाट पाहतोय!

आपला
अभिजित खोसे


(अहमदनगर सोशल मिडीया या पेज वर पब्लिश होणार्या बातम्या ही अहमदनगर लाइव्ह ची बातमी/भूमिका नसते सोशल मिडीयावर चर्चित आणि व्हायरल झालेल्या पोस्ट ह्या पेज वर शेअर केल्या जातात)
Powered by Blogger.