जातीय विषमता भेदण्यासाठी युवकांना एकत्र येण्याची गरज -अनिकेत आमटे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात जातीय संघटना विकासाला घातक ठरत आहे. जातीय विषमता भेदण्यासाठी युवकांना एकत्र येण्याची गरज आहे. शाळा देखील जात, धर्म व पंथामध्ये विभागले जावून, जातीयतेचे विष विद्यार्थ्यांमध्ये पेरले जात आहे. जातीयता थोपवण्याची युवकांची जबाबदारी असून, शाळांपासूनच काम सुरु करण्याचे आवाहन डॉ.प्रकाश आमटे यांचे पुत्र तथा हेमलकासा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी केले. 

समाजातील निराधार, वंचित घटकांच्या आणि रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनाकरिता झटणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने बडी साजन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा शक्ती संवाद आणि सन्मान सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, प्रदिप पेंढारे, संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ, संजय शिंगवी, शारदा होशिंग, अंजली देवकर उपस्थित होते.
पुढे आमटे म्हणाले की, एखाद्या संस्थेच्या सामाजिक कार्याने प्रेरणा मिळून जीवनाला दिशा मिळू शकते. हेमलकसा येथे शिक्षणामुळे परिवर्तन घडले. सामाजिक काम करणार्‍यांना अडचण येत असते. मात्र सातत्याने निस्वार्थपणे काम केल्यास समाजमान्यता मिळते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनते पर्यंन्त आपले काम पोहचवू शकत असल्याची भावना व्यक्त करुन, त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचा प्रवास विशद केला.
प्रितमकुमार बेदरकर यांनी ही कार्यशाळा म्हणजे मी कडून, आंम्ही कडे घेऊन जाणारा जीवनसमृद्ध प्रवास आहे. तरुणांची समाजाबद्दलची संवेदनशीलता, जाणीव आणि सहभाग वाढविण्याकरिता तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट केले. तसेच बेवारस मनोरुग्णांना आधार देवून, त्यांच्या पुनर्वसनाकरिता कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेचे कार्य व पार्श्‍वभुमी स्पष्ट केली. आजवर संस्थेच्या वतीने 425 रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Loading...
Loading...
सुधीर लंके म्हणाले की, नकळत युवकांवर आजच्या व्यवस्थेचे संस्कार होत आहे. राष्ट्रनिर्मिती युवकांद्वारे होणार आहे. युवकांनी राष्ट्रवाद समजण्याची गरज आहे. समाजातील विसंवाद दूर करण्याचे काम युवकांना करावयाचे आहे. युवकांनी मौन धारण करणे समाजासाठी घातक आहे. 

लोकप्रतिनिधी नीट वागण्यासाठी युवकांचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. युवकांनी स्वत:मध्ये परिवर्तन घडविल्यास समाजात परिवर्तन घडणार आहे. युवकांनी समाजातील प्रश्‍न समजून संवाद साधून भुमिका घेत लढण्याची गरज आहे. 

एकीकडे वाळू तस्करांकडून नदीत चालू असलेल्या वाळू उपश्यावर भाष्य करीत, राज्याला दुष्काळ भेडसावून देखील जलसंधारणावर अवघा 2.88 टक्के आमदार, खासदारांनी निधी खर्च केला तर बाकीचा निम्म्यापेक्षा जास्त निधी रस्त्यावर मुरुम टाकणे, सभा मंडप व हायमॅक्सवर खर्च केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सोलापूर येथील स्नेहग्राम संस्थेचे महेश निंबाळकर, नाशिक येथील मानवधर्म फाऊंडेशनच्या सुलक्षणा आहेर, अहमदनगर येथील केअरिंग फ्रेंडसचे अंबादास चव्हाण यांना अनिकेत आमटे यांच्या हस्ते नवशक्ती युवा समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर कोल्हापूर येथील माणुसकी फाऊंडेशनचे अमित प्रभा यांच्या वतीने सतीश शांताराम यांनी पुरस्कार स्विकारला. 

या युवा शक्ती संवाद आणि सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल राठोड यांनी केले. आभार दिलीप गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिकेत आमटे यांनी केडगाव येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास भेट देवून तेथे मनोरुग्णांवर केले जाणार्‍या उपचाराची माहिती जाणून घेतली व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.