संभाजी भिडेंच्या घटनाविरोधी विधानांविरूद्ध सरकार कारवाई करणार का?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धर्मनिरपेक्षता आपणास मान्य नसून मनुस्मृती ही मनुने दिलेली पहिलीच घटना असल्या संदर्भातील संभाजी भिडे यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवणार का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संभाजी भिडे यांच्या सदरहू विधानाबाबत संताप व्यक्त करताना ना.विखे पाटील म्हणाले की,मनुस्मृती ही पहिलीच घटना असल्याचे वक्तव्य म्हणजे भारतीय राज्य घटनेचा अवमान आहे. एवढेच नव्हे तर धर्मनिरपेक्षता आपणास मान्य नसल्याचेही भिडेंनी म्हटले आहे. मात्र धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा आत्मा व लोकशाहीचा पाया आहे. यामुळे भिडे यांचे हे व्यक्तव्य देखील घटनाविरोधी आहे. 

भारतीय राज्यघटना आणि या घटनेने स्विकारलेल्या मुल्यांविरोधात जाहीरपणे वक्तव्य करुन संभाजी भिडे यांनी एकप्रकारे भारताच्या संविधानालाच आव्हान दिले आहे. भिडे यांनी केलेल्या विधानांमधून धार्मिक विद्वेषाला देखील चिथावणी मिळते आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.