नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय.'यूपीएससी'शिवाय बनता येणार अधिकारी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. मात्र, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ह्या परिक्षेला बाय करत खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही सरकारी सेवेची कवाडे उघडी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Loading...
या निर्णयानुसार, पदवीधर किंवा खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शासकीय सेवेद्वारे 'लोकोद्धार' करण्याचा मार्ग खुला होणार आहे.केंद्र सरकारने रविवारी बहुप्रतीक्षित 'लॅट्रल एंट्री'ची अधिसूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

 या अधिसूचनेनुसार, खासगी नोकरदारांना केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा, आर्थिक व्यवहार, कृषी, रस्ते वाहतूक, शिपिंग, पर्यावरण, रिन्युएबल एनर्जी, नागरी उड्डयण आणि व्यापार आदी १० मंत्रालये व विभागांत थेट सहसचिवपदी नियुक्ती मिळेल. 

प्रस्तुत निर्णयामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कौशल्य व क्षमतेनुसार स्वत:चा विकास साधण्याची संधी मिळेल, असे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले. 'लॅट्रल एंट्री'द्वारे उमेदवारांना थेट सहसचिवपदी नियुक्ती दिली जाईल. 

ही नियुक्ती ३ वर्षांची असेल. या काळात त्यांची कामगिरी चांगली राहिली, तर त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवला जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची कमाल अट कोणतीही नाही. पण, किमान वय ४० वर्षांचे ठरवण्यात आले आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना केंद्रीय सहसचिवांएवढेच वेतन व सुविधा मिळतील. त्यांची निवड कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वातील निवड समिती करेल. पदवीधर अथवा एखाद्या सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा नोकरदार, विद्यापीठ अथवा एखाद्या खासगी कंपनीत १५ वर्षे नोकरी केलेल्या व्यक्तीलाही या अंतर्गत आपल्या योग्यतेनुसार अर्ज करता येईल. 

त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल. उल्लेखनीय बाब म्हणजे २००५ च्या प्रशासकीय सुधारणा अहवालाद्वारे सर्वप्रथम 'लॅट्रल एंट्री'चा प्रस्ताव सूचित करण्यात आला होता. मात्र, तेव्हा तो साफ धुडकावून लावण्यात आला होता. तद्नंतर २०१० मध्ये पुन्हा हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव लागू करण्याचा पहिला गंभीर प्रस्ताव मोदी सरकारने केला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.