पाथर्डी खरेदी-विक्री संघात 52 लाख रुपयांचा गैरव्यवहार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाने उभारलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामामध्ये 52 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यात दोषी असलेल्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संघाचे व्यवस्थापक बारवकर यांच्या काळातील सर्व व्यवहार रद्द करावेत, तसेच बाजार समितीच्या आवारात आमदार राजळे समर्थकाने केलेले अतिक्रमण तातडीने काढावेत, या मागणीसाठी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निबंधक कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

 येत्या 15 दिवसांत कारवाईला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रभारी सहायक निबंधक अधिकारी अनिल भांगरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या कारभारावरून आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे गटात सुप्त राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मागील आठवड्यात ढाकणे गटाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या कामकाजावरून राजळे समर्थकांनी सहायक निबंधक कार्यालयात धरणे आंदोलन केले

तर राजळे गटाच्या ताब्यात असलेल्या संघाच्या कामकाजावरून ढाकणे यांनी प्रतिधरणे आंदोलन करीत राजळे यांना खिंडीत गाठले.आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी आपल्या भाषणातून स्व. राजीव राजळे व राजळे गटाच्या ताब्यात असलेल्या दूध संघ, खरेदी-विक्री संघ व वृद्धेश्वर कारखान्याच्या कारभारावर टीकेची चांगलीच तोफ डागली. 

या वेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले, “”माझ्या ताब्यात असलेल्या केदारेश्वर कारखान्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वय 58 झाल्यानंतर आपण दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. मात्र, राजळे यांनी जिल्हा बॅंकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची नेमणूक संघाच्या व्यवस्थापकपदी करून नियमांना हरताळ फासला. 

आमच्या ताब्यात समितीची सत्ता आल्याने व ती नफ्यात आल्याने राजळे यांना पोटदुखी झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून केलेले पाप दडविण्याचा ते प्रयत्न करीत असून, राजीव राजळे हे आपले मित्र होते. त्यांचे वर्षश्राद्ध झाल्याशिवाय आपण काहीच बोलणार नव्हतो. मात्र, विनाकारण आपल्यावर आरोप केले गेल्याने आंदोलन करत आहोत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.