भाजप सरकार अन्नदात्या शेतक-यांच्या जीवावर उठले - राजेंद्र नागवडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील शेतक-यांच्या तोंडाला केवळ आश्वासनांची पाने पुसण्याचा कृतघ्नपणा सरकारने केला आहे.सरकारने जगाचा अन्नदाता असलेल्या शेतक-यांची दिशाभूल करण्याचे पातक केले आहे.राज्यातील शेतक-यांनी एक जूनपासून पुन्हा संप व आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आपला हक्क मिळविण्यासाठी व मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी पक्षाभिनिवेष न बाळगता या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

मागील वर्षी एक जूनला शेतकरी संपाची संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर सरकार हडबडून गेले पण ढोंगी सरकारने शेतक-यांची फसवणूक करीत त्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचे घोर पाप केले याशिवाय शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्रही केले. हे सरकार शेतक-यांच्या जीवावरच सत्तेत आलेले असले तरी आता ते अन्नदात्या शेतक-यांच्या जीवावर उठले असल्याची टीका करुन नागवडे म्हणाले की,सरकारने शेतक-यांच्या समस्या व मागण्या समजून घेवून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात हीच आंदोलक शेतक-यांची न्याय्य मागणी आहे.

शेतक-यांचे हक्क व शेतीमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी एक जूनपासून सुरु होणा-या संप,आंदोलनात शेतक-यांनी सक्रिय सहभागी होवून सरकारला आपल्या मागण्यांची दखल घ्यायला भाग पाडण्याची गरज आहे.शेतक-यांच्या ऐक्याची वज्रमूठ झाल्याशिवाय हे सरकार शेतक-यांसमोर झुकणार नाही.शेतक-यांनी पक्षीय राजकारणाची झूल बाजूला ठेवून आपल्या न्याय्य हक्काच्या लढाईत सहभागी होवून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.