पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसची ट्रॅक्टरला भीषण धडक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डोळासणे शिवारात शिवशाही एस.टी.बसने पाठिमागून पाण्याचा टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण धडक दिल्याची घटना गुरुवार दि.३१ मे रोजी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे. तर बसचा दरवाजा तुटल्याने बसमधील प्रवाशांना काचा फोडून नागरिकांनी सुखरुप बाहेर काढले. 

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम १९४३ हिच्यावरील चालक रविंद्र अभिमान कोळी हा बसमधून ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन पुणे येथून आळेफाटा मार्गे नाशिककडे येत होता. गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास ही बस महामार्गावरील डोळासणे शिवारात असणाऱ्या सह्याद्री ढाब्यासमोर आली. त्याच दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एमएच १७ एई ८५९६ यावरील चालक संजय बाबाजी कुडेकर (रा.पिंपळगाव देपा) हा घारगावकडून पिंपळगाव देपा मार्गे जात होता. 

त्याच दरम्यान भरधाव वेगात शिवशाही बसने ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टँकरला जोराची धडक दिली. धडक इतकी भयानक होती की ट्रॅक्टरचे टायर फुटून पाण्याचा टँकरही पलटी झाला. तर बसच्या पुढील बाजूचे पुर्णपणे नुकसान झाले होते. त्यामुळे दरवाजाही तुटला आणि प्रवाशांनी एकच आक्रोश केला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बसमधील ३० ते ३५ प्रवाशी पुर्णपणे घाबरुन गेले होते. 

शेवटी नागरिकांनी बसच्या काचा फोडून या सर्व प्रवाशांना बसमधून सुखरुप बाहेर काढले. यामध्ये ट्रॅक्टर चालक संजय कुडेकर हा जखमी झाला आहे. या अपघातामध्ये शिवशाही बसचे व ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी नवनाथ येशू खेमनर (रा.पिंपळगाव देपा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी शिवशाही बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.