केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकरचा सहभाग उघडकीस


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. यासंदर्भात सीआयडीने शुक्रवारी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. 

भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून सरकारी पक्षाने म्हणणे सादर केले आहे. आरोपी पक्षाला अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आला असून पुढील सुनावणी दि. १३ जूनला ठेवण्यात आली आहे. केडगाव पोटनिवडणुकीनंतर दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भानुदास कोतकर यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी भानुदास कोतकर हा न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

Loading...
शुक्रवारी सीआयडीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकरचा हस्तक्षेप असल्याचे सबळ पुरावे हाती लागले असल्याचे त्यात म्हटले आहे. कोतकर याला सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

त्यावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. कोतकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर या आधी अनेक गुन्हे दाखल आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात कोतकरला शिक्षा झालेली आहे. 

त्याच्याकडे पैसे आणि ताकद आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून याचा तपास सुरू आहे. त्यामुळे कोतकर याला जामीन देऊ नये असे म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले.दरम्यान, कोतकर याचा जामीन रद्द करावा अशी मागणी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात केलेली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.