कुकडीचे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई न केल्यास आत्मदहन - वराळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कुकडी डावा कालव्यातून अवैधरीत्या पाणी उचलणाऱ्यांवर कुकडी डावा कालवा अधिकाऱ्यांनी बुधवार, दि. 13 जूनपर्यंतपर्यंत कारवाई न केल्यास गुरुवार, दि. 14 जूनपासून निघोज येथील कुकडी कार्यालयासमोर आमरण उपोषण व उपोषणाची दखल न घेतल्यास शुक्रवार दि.15 जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा मंगेश वराळ व शेकडो शेतकऱ्यांनी दिला आहे. 

याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार, आमदार, तहसीलदार, पोलीस निरीक्षक पारनेर यांना पाठविले आहे. निवेदनावर शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

याबाबत वराळ यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून कुकडी डावा कालवा नारायणगाव येथील वरिष्ठ अधिकारी व निघोज कुकडी शाखाधिकारी यांच्या आशीर्वादामुळे शेतकरी पाणी चोरी करीत आहेत, यामुळे निघोज कुंड, टाकळीहाजी, ता. शिरूर या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रत्येकवर्षी आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, अधिकारी पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करत नाहीत.

Loading...
दरवर्षी पाण्याअभावी आमची जनावरे मरतात, लाखो रुपयांची शेतीपिके जळून जातात, त्यापेक्षा आत्मदहन करून एकदाचे मेलेले बरे, ही मानसिकता शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपूर्वी कुकडी कार्यालयासमोर पाचशे शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह केला होता.

तब्बल 31 तासानंतर कुकडी अधिकाऱ्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, पारनेर पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही, ही सबब सांगितली गेली. दि. ५ जून रोजी कारवाई करणार होते. मात्र, अद्यापही कारवाई केली नाही यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आमरण उपोषण व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.