जिल्हा परिषदेच्या शाळासाठी शिर्डी संस्थानकडून 10 कोटी निधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जिल्हा परिषदेच्या नव्याने शाळा खोल्या उभारण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने 30 कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10 कोटी संस्थानने जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

Loading...
दरम्यान, संस्थान निधी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीतून संस्थानच्या स्थानिक समितीने शाळाखोल्यांची निवड करावी, असे निर्देश शाळाने दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला शाळाखोल्या निवडीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील दुर्घटना झाल्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे ऑडिट करण्यात आल्यानंतर 1092 शाळाखोल्या नव्याने बांधण्याची आवश्‍यकता असल्याचे चित्र समोर आहे. आजही या शाळाखोल्यांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून बसत आहे. 

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने शाळा खोल्यांसाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली होती. परंतु, संस्थानने निधी देण्याबाबत टाळाटाळ केली होती.

1092 शाळाखोल्या उभारणीसाठी 68 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. एवढा मोठ्या प्रमाणावर निधी शासनस्तरावरून उपलब्ध होणे अशक्‍य असल्याने शिर्डी साईबाबा संस्थानने निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नव्याने शाळाखोल्या उभारणीसाठी निधी देण्याचे मान्य करण्यात आले होते. 

त्यानंतर संस्थानच्या बैठकीत 30 कोटी देण्याचा निर्णय झाला. हा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात यावा, असे ठरले. त्यानुसार मंगळवारी शासनाने आदेश काढला असून पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी देण्याचे आदेश दिले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.