राहुरीतील अवैध वाळूउपसा आणि गुन्हेगारी राजकीय पाठबळामुळेच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर, जामखेड येथील घटनांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जे आदेश काढले आहेत, त्या आदेशाची खरोखर अंमलबजावणी झाली, तर राहुरी तालुक्यातील गेल्या १० ते १२ वर्षांतील गुन्हेगारी आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. वाळुच्या अवैध धंद्यामुळे व त्यास मिळालेल्या राजकीय पाठबळामुळे तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस खात्याचे दुर्लक्ष व त्यास मिळणारा नेत्यांच्या आशीर्वादही कारणीभूत ठरला आहे.


वाळूउपसा करण्यासाठी मोठी स्पर्धा 
शिर्डी- शिंगणापूर देवस्थानला जोडला जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील असणारा राहुरी तालुका सर्वत्र प्रसिद्ध असून गुन्हेगारीच्या बाबतीत शांत व संयमी तालुका म्हणून त्याची नोंद होती; पण तालुक्यातील मुळा प्रवरा नदी पात्रातील वाळुला जशी मागणी वाढायला लागली व या दोन्ही नद्यांतून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूउपसा सुरु झाला व त्यातून तालुक्यात वाळूउपशास जिल्ह्यातून वाळूतस्कर येऊ लागले व त्यांच्यात वाळूउपसा करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली.

ना पुढाऱ्यांचा वचक राहिला ना पोलिसांचा!
मग त्यातून गुन्हेगारी हळूहळू वाढत गेली व त्यास राजकीय नेत्यांबरोबर महसुल व पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले. वाळुच्या माध्यमातून वाळूतस्करांना जसा पैसा मिळत गेला, तसा त्यावर उपजीविका करणाऱ्या सर्वाना पैसा दिसू लागला. रात्रभर वाळुतस्करांना मदत करुन पैसा मिळवायचा व दिवसभर उडवायचा, असा प्रकार सुरू झाला. त्यात अनेकांची मैत्री झाली, अनेकांशी वैर वाढत गेले. त्यात खून, मारामाऱ्या इत्यादी प्रकार वाढत चालले, हे सर्व होत असताना त्यावर ना पुढाऱ्यांचा वचक राहिला ना पोलिसांचा, ना पोलीस अधिकाऱ्यांचा.

 गुन्हेगारीमध्ये सर्वात अग्रेसर तालुका
राहुरी तालुक्याला कट्टा हा प्रकार १० ते १५ वर्षांपूर्वी माहीत नव्हता. तसेच खंडणी वसुली, चेन स्नॅचिंग, लूटमार, गुंडगिरी, दादागिरी, मुलींची छेड, रस्तालूट, व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार, शेतातील विद्युतपंपाच्या चोरी, घरफोड्या असे अनेक गुन्हे वाढत चालल्याने जिल्ह्यात सर्वात शांत तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये सर्वात अग्रेसर तालुका झाला.

तर तालुक्यातील गुन्हेगारी निश्चित आटोक्यात..
या सर्व प्रश्नांबाबत काही वर्षापूर्वी माजी आमदारांना लोकांनी व्यथा सांगितल्या असता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या तीन वर्षात गुन्हेगारीवर वचक बसला, तरी त्यात सुधारणा नाही. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तालुक्यात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या आदेशाचे खरोखर पालन झाले, तर तालुक्यातील गुन्हेगारी निश्चित आटोक्यात आल्याशिवाय राहाणार नाही.

तस्करांवर राजकीय वरदहस्त 
वाळूतस्करांवर कारवाई करताना त्यांच्या पंटरांवर नजर ठेवून पोलिसांनी कारवाई केल्यास अनेक गुन्हे उजेडात येतील. वाळूतस्करांनी आता शासकीय वाळू उपशाबरोबरच खासगी शेतकऱ्यांच्या शेतीतील वाळू उपसण्यास सुरुवात केली आहे. शेतीच्या मालकांना दमबाजी करत आहेत. तस्करांवर राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस व महसूल खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.