पालकमंत्री राम शिंदे यांच्या आर्शिवादाने गुंडाना आश्रय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पालकमंत्री राम शिंदे यांच्या आर्शिवादाने गुंडाना आश्रय मिळत आहे. त्यामुळेच तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. दुसरीकडे विरोधात बोलणार्‍या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून हद्दपारीच्या नोटिसा देवून अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. असा भेदभाव का? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी जामखेड येथील मोर्चा प्रसंगी प्रशासनाला विचारला.


जामखेडमध्ये योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तहसीलदार विजय भंडारी व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

आरोपी व कटाचे सूत्रधार अद्याप मोकाट 
जामखेडमध्ये योगेश व राकेश राळेभात यांची भरवस्तीत हत्या करण्यात आली. घटना घडून दहा दिवस झाले तरी पोलिस प्रशासनााकडून सदर हत्याकांडाचे पाळेमुळे खणून काढण्यात मात्र अपेक्षित प्रगती झालेली नाही, ही खेदाची बाब आहे. काही आरोपी व कटाचे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. वास्तविक एवढे संतापजनक कृत्य घडूनही मृतांचे नातेवाईक व तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने शांतता व संयम पाळत प्रशासनास सहकार्याची भूमिका घेतली आहे. 

सर्व सामान्यांमध्ये तीव्र असंतोष.
या कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत मराठा समाज व सर्व सामान्यांमध्ये तीव्र असंतोष व संतापाची भावना आहे. सदर घटनेच तपास ज्या प्रकारे सुरू आहे व ज्या पद्धतीने आरोपी अटक होत आहेत ते पाहता मृंताचे कुटुंबीय व समाजात संभ्रमाचे वातावरण आहे म्हणून या हत्याकांडाच्या विरोधात विविध मागण्यासांठी मोर्चा काढून न्यायाग्रह आंदोलन करीत आहोत. या दुहेरी हत्याकांडाचे सूत्रधार व सर्व आरोपी अटक करून त्यांचे सर्व पाठीराखे शोधून कारवाई करण्यात यावी. 

उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी.
गुन्ह्याचा तपास कार्यक्षम आयपीएस अधिकार्‍यांकडे सोपवावा, या हत्याकांड प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी. या गुन्ह्यातील आरोपींना जामखेड शहर व तालुक्यात तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी यापूर्वीही गोळीबार करणे व इतर अनेक गुन्हेगारी कृत्ये करीत दहशत माजवली आहे. 

तालीम प्रशासनाने पाडावी, न पाडल्यास आम्ही पाडू
तालुक्यात दिवसाढवळ्या पोलिसां समक्ष हत्या करूनही त्यांचेवर त्या त्या वेळी ठोस कारवाई केली गेली नाही म्हणून या आरोपींची मजल योगेश व राकेश राळेभात यांचा खून करण्यापर्यंत गेली. यास तालुक्यातील गुन्हेगारांचे राजकीय गॉडफादर, बेजबाबदार व निष्किय लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनही जबाबदार आहे. तालमीच्या माध्यमातून गुंडाना आश्रय दिला जात आहे त्यामुळे ही तालीम प्रशासनाने पाडावी, न पाडल्यास आम्ही पाडू, अशा इशारा संजीव भोर यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.