सारोळा कासार येथे महाश्रमदानासाठी सुमारे ४ हजार जलमित्रांनी हजेरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सारोळा कासार (ता.नगर)गावात पानी फाउंडेशन व भारतीय जैन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानासाठी सुमारे ४ हजार जलमित्रांनी हजेरी लावत श्रमदान केले.जलमित्रांचे जणू तुफानच सारोळा कासारच्या माळरानावर या निमित्ताने पहावयास मिळाले.या महाश्रमदानाचे उद्घाटन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,कोहिनूर वस्रदालनाचे संचालक प्रदीप गांधी,भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडिया,भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अॅड.शाम असावा यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता झाले.त्यानंतर दिवस भर श्रमदानासाठी जलमित्र,विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,लहान थोर महिला ,शालेय विद्यार्थी यांचा जणू ओघच लागला होता.

विस्तीर्ण माळरान श्रमदात्यांनी फुलून गेले !
महाश्रमदान साठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर,तहसीलदार आप्पासाहेब शिंदे,त्यांच्या पत्नी सौ.शिंदे ,पंचायत समितीचे बी. डी. ओ.वसंत गारुडकर,मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी, प्रसिध्द उद्योगपती नरेंद्र फिरोदिया,सनफार्मा कंपनीचे एच.आर.अजय श्रीवास्तव,शिक्षणाधिकारी अरुण धामणे,न्यू आर्टस्चे उपप्राचार्य आर.जी.कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.याशिवाय भारतीय जैन संघटना,कोहिनूर वस्त्रदालनाचे ८० कर्मचारी,इंडियन डेंटल असोशिएशनची नगर शाखा,बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे एनसीसीचे छात्र यांच्यासह नगर शहरातील विविध मोर्निग ग्रुपचे सदस्य,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य हे ही या उपक्रमात सहभागी झाले होते.

१ हजार क्युबीक मीटर एवढे खोदाईचे काम
श्रमदानासाठी येणाऱ्यांचे पंचायत समितीचे सदस्य रविंद्र कडूस,सरपंच सौ.आरती कडूस ,उपसरपंच दत्तात्रय कडूस,ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश कडूस,शीलाताई कडूस,संजय पाटील,डॉ.श्रीकांत देशपांडे,संजय काळे,सुनील हारदे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले.पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे,तालुका समन्वयक विक्रम फाटक,दिलीप कातोरे,यांच्यासह सर्व तांत्रिक मार्गदर्शक यांनी श्रमदात्यांना काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.पाणी पुरवठा कमिटी,पार्किंग कमिटी, भोजन कमिटी, स्वागत कमिटी, नोंदणी कमिटी,श्रमदान कमिटी, आणि महत्वाचे म्हणजे तुटलेली अवजारे नीट करून देणारे गावातील सर्व वयोवृद्ध शेतकरी या सर्वांनीच दिवसभर अतिशय झोकून देत परिश्रम घेतले.त्यामुळे दिवसभरात सुमारे १ हजार क्युबीक मीटर एवढे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिठलं भाकरीचा आस्वाद 
श्रमदानासाठी नगर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या जलमित्रांचा ग्रामस्थांनी पिठलं भाकरी,लाल हिरव्या,जवसाच्या कारळ्याच्या मिरचीचा ठेचा,कैरीचे लोणचे,थंडगार मठ्ठा या सर्व गावरान पद्धतीच्या जेवणाने पाहुणचार केला.यासाठी गावातील प्रत्येक घराघरातून भाकरी व ठेचा जमा करण्यात आला होता. श्रमदान करून थकलेल्या श्रमदात्यांनी त्याचा मनमुराद आस्वाद घेतला.जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही त्यांनी व प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर,तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनीही ग्रामस्थांसमवेत डोंगरावर भोजन केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.