प्रभारी अधिकार्‍यांच्या जीवावर जिल्हा विभाजन करणार कसे - डॉ.सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पालकमंत्र्याच्या जामखेड तालुक्यातच प्रभारी अधिकार्‍यांचे राज्य कार्यरत असताना सुध्दा जिल्हा विभाजनाचे स्वप्न दाखवलेच कसे जाते ?असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. के. के. रेंजचा प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.भामरे याच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

तालुक्यातील ढवळपुरी येथे पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे फोंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. विखे यांनी नगर दक्षिणेच्या खुंटलेल्या विकासाच्या प्रक्रियेवर नेमकेपणाने बोट ठेवून लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेवर कडक शब्दात टिका केली.

पाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा कोणी केला ?
गेली अनेक वर्षे तुम्ही ज्यांना मतदान करता त्यांना जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे याकडे लक्ष वेधून डॉ.सुजय विखे म्हणाले की, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा कोणी केला ? योजनेचे पाईप कोणाच्या घरात गेले याची चौकशी होण्याची मागणी विखे यांनी केली.


निवडणुकीतील विजय हा विकासासाठी
ढवळपुरी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय हा विकासासाठी मिळालेला आहे. या गावाने पद्मभूषण खासदार साहेबांवर सातत्याने प्रेम केले तेच प्रेम माझ्यावरही आज व्यक्त होत असल्याचा आनंद मोठा आहे. सामान्य माणसासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी करिता तालुक्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

पालकमंत्र्याचा तालुकाच प्रभारी
आज जिल्ह्यातील प्रशासन योजनांच्या अंमलबजावणीत ठप्प आहे. पालकमंत्र्याचा तालुकाच प्रभारी झाला असल्याने गुन्हेगारीने परिसीमा गाठली असल्याचा आरोप डॉ.विखे यांनी केला. याप्रसंगी सभापती राहूल झावरे, पुप्षाताई वराळ, डॉ.राजेश भनगडे, डॉ.भास्करराव शिरोळे, दिनेश बाबर, शांताराम कुटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काठी घेवूनच आता खेळणार !
डॉ.सुजय विखे पाटील यांचा धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक सत्कार करण्यात आला. बांधलेल्या फेट्यावर मी खूप खूष आहे. लग्नातला फेटा पाच मिनिटात उतरवला होता.पण हा फेटा वेगळ्या प्रेमाचा असल्याचे सांगत त्यांनी फेटा डोक्यावर ठेवूनच भाषण केले. आणि तुम्‍ही काठी घेवूनच आता खेळणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.