जामखेड हत्याकांड :अडीच महिन्यांपूर्वीच रचला हत्येचा कट!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड (२२ वर्षे, तेलंगशी, जामखेड) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग व जामखेड पोलिसांनी बुधवारी रात्री ही संयुक्त कारवाई केली. 


हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या
घटना घडल्यानंतर तिघे पसार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पंधरा पथके रवाना झाली होती. दरम्यान, आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी जामखेडचा माजी सरपंच कैलास विलास माने, त्याचा भाऊ प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड (मुख्य आरोपी गोविंदचे वडील), सचिन गोरख जाधव, बापू रामचंद्र काळे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अडीच महिन्यांपूर्वीच हत्येचा कट रचला
गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी योगेशला ठार मारण्याचा कट रचला होता. अडीच महिन्यांपासून ते योगेशच्या मागावर होते, परंतु त्यांना योग्य संधी मिळत नव्हती. योगेशला त्याची भनकही लागली नाही. घटनेच्या दिवशी शनिवारी आरोपी योगेशच्या मागावर होते. 

२८ एप्रिलला संधी मिळाली
अखेर २८ एप्रिलला त्याला ही संधी मिळाली. योगेश आपल्या मित्रांबरोबर हॉटेलसमोर गप्पा मारत बसला होता. दुचाकीवर आलेल्या या तिघा आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. योगेशवर गोविंदने गोळ्या झाडल्या, तर राजेशवर अल्पवयीन आरोपीने गोळ्या झाडल्या. तशी कबुली गोविंदने पोलिसांसमोर दिली.

हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशातून आणले गावठी कट्टे
जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला मांडवगण फराटा येथे अटक करण्यात आली. आरोपींची माहिती देताना अधीक्षक शर्मा.

वर्षभरापूर्वी झाली होती हाणामारी
डिसेंबर २०१६ मध्ये आरोपी गोविंद गायकवाड याच्याकडून एका वृध्दाच्या अंगावर पाणी उडाले होते. या वृध्दाने गोविंदला खडे बोल सुनावले. त्यानंतर गोविंदने वृध्दास मारहाण व शिवीगाळ केली. या वृध्दाने झाला प्रकार योगेशला सांगितला. त्यानंतर योगेशने मित्रांसह गाेविंदला मारहाण केली. तोडगा निघाल्याने हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. मात्र, या घटनेनंतर योगेश व आरोपींत वारंवार खटके उडत होते. त्यामुळेच गोविंदने योगेशला संपवण्याचा निर्णय घेतला.

फरार आरोपीचा शोध सुरू
जामखेड हत्याकांडातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. विजय सावंत हा आरोपी फरार असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल. तिघांनी मिळून हा गुन्हा केला असून एक आरोपी अल्पवयीन असून तो अवघा १७ वर्षांचा आहे. गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.-रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.