कर्जत मध्ये कौटुंबिक वादातून वडील व मुलामध्ये रंगला बंदुकीचा खेळ!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील सातपुते वस्तीवर वडील आणि मुलामध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलाला घाबरविण्यासाठी परवाना असलेल्या बंदुकीचा धाक दाखविला. मात्र, या वेळी गोळीबार झाल्याची अफवा सोशल मीडियासह तालुकाभर पसरली आणि चर्चेला एकच उधाण आले. 


दरम्यान, घटनास्थळी येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, गोपनीय विभागाचे मनोज लातुरकर, पोलीस दत्तात्रय कासार,सुरेश बाबर, प्रल्हाद लोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी परशराम सातपुते व नीलेश सातपुते दोघे रा. कोकणगाव, ता. कर्जत यांच्यावर प्रतिबंधक कारवाईची नोटीस बजावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

काही दिवसांपासून घरगुती वाद
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नगर- सोलापूर मार्गावरील कोकणगाव येथे दोन मुले आणि त्यांचे वडील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद होता. मात्र, आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान हा वाद अचानक उफाळून आला व त्याचे पर्यवसान कडाक्याच्या भांडणात झाले. 

मुलांना घाबरविण्यासाठी आणली परवाना असलेली बंदूक !
वडील,आई आणि दोन मुले शेलक्या शब्दांत एकमेकांचा उद्धार करू लागले. शेवटी हा प्रकार असहाय्य झाल्याने वडिलांनी स्व संरक्षणासाठी व मुलांना घाबरविण्यासाठी परवाना असलेली बंदूक आणली. यामुळे कडाक्याचे भांडण एका क्षणात मिटले. मात्र, हा प्रकार सर्वदूर पसरला आणि गोळीबार झाल्याची अफवा सर्वत्र पसरली.

वडील व मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात. 
पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर काही वेळापूर्वी भांडणे करणारी दोन मुले आणि त्यांचे वडील एकत्र येत आमचे घरगुती भांडण होते ते आता मिटले आहे. काही तक्रार नाही, असे सांगितल्यावर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर वडील व मुलाने मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रात जबाब दिले असता, भादंवि.कलम 151 अन्वये वडील व मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.