मराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे - चंद्रकांत पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका कुठे होतात, त्यांना सभागृह कोण उपलब्ध करून देते, अर्थपुरवठा कोण करत आहे, याची संपूर्ण माहिती सरकारकडे असल्याचा दावा महसूल मंत्री चंदकांत पाटील यांनी केला आहे, मराठा कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या यशवंराव चव्हाण सेंटरमध्ये होतात, त्या सभागृहाचे भाडे कोण भरते, असा सवालही त्यांनी 'राष्ट्रवादी'ला उद्देशून केला.


मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठकीद्वारे संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अामचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या समाजातील कार्यकर्त्यांना भडकवण्याचे काम काही लोक करत असल्याचा आरोप करत राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. 

मराठा कार्यकर्त्यांना भडकवले जातय !
भाजप सरकार मराठा समाजाच्या उन्नतीसाठी युद्ध पातळीवर काम करत आहे . मात्र, नवनवे मुद्दे काढून मराठा कार्यकर्त्यांना भडकवले जात आहे. ओबीसी समाजाला शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर मराठा समाजासाठीही ही सवलत देण्यात येत आहे. याशिवाय मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाड्याने जागा घेण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
  
सरकार आपले काम करतच राहिल
सरकार करत असलेल्या कामावर ९९ टक्के मराठा समाज समाधानी असून फक्त एक टक्का समाज अशा भडकवणाऱ्यांमुळे नाराज अाहे. मात्र कुणीही मराठा समाजाला कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार आपले काम करतच राहिल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा समाजासाठी सरकारच्या विविध याेजना 
पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतचा निर्वाह भत्ता, दहा महिन्याचे ३० हजार रुपयांचे अनुदान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीस हजार रूपयांचा निर्वाह भत्ता, तसेच आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. याशिवाय मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत शासन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.