भाजप सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप सरकार हे दगडाच्या काळजाचे आहे, त्यामुळे या दगडी सरकारला शेतकऱ्यांविषयी पाझर कधीच फुटणार नाही', अशी घणाघाती टीका शिवसेना नेते तथा अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केली. शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोफत दूध वाटपाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. 



या सप्ताहात गांधीगिरी करून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (३ मे) सकाळी ९ वाजता सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.

भाजप सरकारला दगडाची उपमा.
या वेळी सरकारला दगडाची उपमा देऊन एक दगड खुर्चीवर आणून ठेवण्यात आला. या दगडाची विधीवत पूजा करून त्यास हळदी-कुंकू वाहून दुग्धाभिषेक घालण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, भाकपचे विलास नवले, सोमनाथ नवले, सरपंच प्रदीप हासे, काँग्रेसचे विलास नवले, गणेश ताजने आदी उपस्थित होते.

सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 
महेश नवले म्हणाले, 'भाजप सरकार शेतकरीविरोधी असून या सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकाही शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, सगळे रस्ते टोमॅटोच्या खचाने लालेलाल झाले आहेत. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणण्यासाठी गांधीगिरी करून मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम आपल्याला तालुक्यात राबवायचा आहे', असेही नवले म्हणाले. 

पाण्याची बाटली वीस रुपयांना,अन् गायीचे दूध पंधरा!
संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग म्हणाले, 'पाण्याची बाटली वीस रुपयांना झाली, अन् आमच्या गायीचे दूध पंधरा रुपये लिटर झाले.' भाजप सरकारचा धिक्कार असो, आशा घोषणा देत या आंदोलनाची सांगता झाली.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.