शुक्रवारी सर्वात मोठा सरकारी वाढदिवस !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आजच्या आधुनिक काळात वाढदिवस म्हणजे मोठा सणच असतो. वाढदिवशी प्रतिष्ठेसाठी लाखो रूपये खर्च करण्याची नवी संस्कृतीच उदयास आली आहे. तरूणाईबरोबरच वृध्दांनाही या संस्कृतीने विळखा घातला आहे. उद्या 1 जून हा भारतातील अनेक जणांचा जन्मदिनांक असतो. आज 2018 साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा 1 जून हा वाढदिवस असतो. राज्यातील अनेक मंत्र्यांचाही उद्याच शुक्रवारी वाढदिवस आहे. 

1 जून हा सर्वात मोठा सरकारी वाढदिवस ठिकठिकाणी साजरा होत आहे. सन 1980 दशकापर्यंत जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत आजच्या काळाएवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आई-वडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसे, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्‍नच यायचा नाही. 

पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा मुलांना शाळेत घालण्यासाठी गुरूजी मुलाला हात वर करायला लावून गुरूजींच्या कानापर्यंत हात आले तर मुलगा शाळेत येण्याइतका मोठा झाला म्हणजे 5 वर्षाचा समजला जात. अशा मुलांना शाळेचे गुरुजी 1 जून ही जन्मतारीख देत असे. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे आजच्या आधुनिक काळातील शाळेतील प्रवेशाइतके अवघड नसे. 

काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख 1 जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस 1 जूनला येतो.

सोशल मिडीयावर उद्या शुभेच्छांचा धुमाकूळ !
तरूणांसह वृध्दांनाही आजच्या सोशल मिडियाने भुरळ घातली आहे. उद्या 1 जून रोजी सर्वांच्या फेसबूकवर शेकडो जणांच्या वाढदिवसाची यादी येईल. भरपूर प्रतिष्ठीत लोकांचे वाढदिवस हे उद्या आहेत. आदीवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासह नगर जिल्ह्यातील माजी मंत्री तथा अकोलेचे आमदार मधुकर पिचड, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, जि.प.चे माजी सभापती बाबासाहेब तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्यासह गावोगावी नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस आहेत. उद्या सोशलवर शुभेच्छा संदेशांचा धुमाकूळ पहावयास मिळणार आहे. 

राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता 
नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवशी राजकीय कोंडी निर्माण होते. गावातील संघर्षामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना दोनही कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहताना प्रश्‍न निर्माण होतो. पारनेर तालुक्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. तालुक्यातील जामगाव येथे राष्ट्रवादीचे बंडखोर व निलेश लंके समर्थक उद्योजक सुरेश धुरपते व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी या दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी आहेत. यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहेत. दोघांचेही वाद औरंगाबाद खंडपिठात सुरू होते. 1 जून रोजी एकाच वेळी दोघांचाही वाढदिवस असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांची कोंडी होते. यातून जुने वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण होते. जिल्ह्यात असे अनेक कार्यकर्त्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येत असल्याने या दिवशी पोलिस प्रशासनही सतर्क असते. अनेकदा वाढदिवशी तलवारीसारख्या शस्त्राने केक कापण्याचे प्रकारही घडतात. सध्या सुरू असलेल्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये अशा घटनांकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.