एक जूनपासून पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार, सरकारी कार्यालयात खाटी जनावरे बांधणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी एक जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 

दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा व लाखगंगा येथील आंदोलकांनी सर्व दुध उत्पादक जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्यात येणार आहे.

शेतकरी संप व ऐतिहासिक लॉँग मार्चला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालत आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने या आंदोलनाची रास्त दखल घेत मागण्यांबाबत कारवाई न केल्यास समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे. 

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. .शेतकऱ्यांच्या विश्वासघाता विरोधात समविचारी संघटनांना सोबत घेत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त व वीजबिल मुक्ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, दुधाला किमान २७ रुपये दराची हमी देणाऱ्या शासनादेशाची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणारांच्या नावे करा, आकारी पड जमिनीचा प्रश्न सोडवा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.
----------------------------
Powered by Blogger.