दारूच्या नशेत डोक्यात दगड टाकून पत्नीचा खून

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दारूच्या नशेत असलेल्या पतीने घरात झोपलेल्या पत्नीचा डोक्यात दगड टाकून खून केला. ही घटना तालुक्यातील खडकवाडी (बोरवाक) येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तुळसाबाई भाऊसाहेब चिकणे (वय २९), असे मयत विवाहितेचे नाव आहे. 


घटनेनंतर आरोपी पती भाऊसाहेब चिकण (वय ३२) रा. बाभुळवाडे, ता. पारनेर हा फरार झाला आहे. याबाबतची फिर्याद मयत महिलेचा भाऊ गंगाराम शिवाजी पारधे रा. खडकवाडी बोरवाक यांनी पारनेर पोलिसांत दिली आहे. या घटनेतील मृत महिलेला दोन मुले आहेत. 

आरोपी भाऊसाहेब चंदर हा बाभुळवाडे येथील रहिवासी असून, १० वषांर्पूर्वी त्याचे तुळसाबाईशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले असून, मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. आरोपी भाऊसाहेब चिकणे याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण करत असे. यामुळे वर्षभरापासून मयत तुळसाबाई ही खडकवाडी येथील बोरवाक येथे आपल्या वडिलांच्या शेजारी झोपडी करून राहत होती. 

दि. २६ मे पासून आरोपी भाऊसाहेब चिकणे हा बोरवाक याठिकाणी येऊन राहू लागला. तू माझ्याबरोबर कामासाठी आळेफाटा येथे चल, असे तो पत्नीला म्हणाला. परंतु पत्नीने त्याच्याबरोबर ज़ाण्यास नकार दिला. दि. ३० मे रोजी रात्री १ ते १.३० च्या दरम्यान जेवण झाल्यानंतर मयत तुळसाबाई व आत्या जनाबाई झोपले असताना भाऊसाहेब चिकणे याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घातला. 

अंधारातच फरार झाला असल्याची माहिती जनाबाई यांनी फिर्यादीला दिली. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हणुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. शेळके साळवे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.