शिवसेने पाठोपाठ निलेश लंकेंचा राष्ट्रवादीला धक्का ! किंगमेकर धुरपते लंकेंच्या गळाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे नीलेश लंके यांच्या गळाला लागले आहेत. १ जूनला उद्योजक सुरेश धुरपते यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जामगाव येथे अभीष्टचिंतन सोहळा व लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन होत आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढवळपुरीतील जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे व भाळवणीतील पंचायत समिती सदस्य सुनंदा सुरेश धुरपते यांना निवडून आणण्यात सुरेश धुरपते यांनी किंगमेकरची भूमिका बजावली होती. 

पंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर काँग्रेसला सभापतिपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा यांना उपसभापतिपदाचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याने ते नाराज झाले होते. 

त्यानंतर भाळवणी येथील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी धुरपते यांची सोशल मीडियावर बदनामी केली. या कुरघोडीच्या व बदनामीच्या राजकारणाला कंटाळून सुरेश धुरपते यांचे लंके यांच्याशी सख्य निर्माण झाले असून हंगे येथील लंकेच्या वाढदिवसाला धुरपते यांनी हजेरी लावत लंके तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती. 

त्यामुळे आता धुरपते यांच्या वाढदिवसानिमित्त जामगाव येथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे सूत्र लंके यांनी हातात घेतले अाहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीला दे धक्का तंत्र अवलंबले असून सुरेश धुरपते काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.