श्रीरामपुरात आ.कांबळे,नगराध्यक्ष आदिक,सभापती पटारे यांना धक्काबुक्की

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भागवतकथेपूर्वी रामगिरी महाराजांच्या मिरवणुकीदरम्यान आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पं. स. सभापती दीपक पटारे यांच्यासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षकासमोर हा प्रकार घडला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दोषींवर कारवाई करून पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. 


तुळजा फाउंडेशनच्या वतीने थत्ते मैदानावर महंत रामगिरी यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी महाराजांचे आगमन झाल्यानंतर मारुती मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. आमदार कांबळे, नगराध्यक्ष आदिक, सभापती पटारे, जि. प. सदस्य शरद नवले, माजी नगराध्यक्ष मंदा कांबळे, अर्चना पानसरे आदी महाराजांचे स्वागत करण्यासाठी राम मंदिर चौकात थांबले होते. 

मिरवणूक चौकात अाली असता हे सर्व महाराजांना हार घालण्यासाठी पुढे गेले. महाराजांभोवती असलेल्या भाविकांनी त्यांना मज्जाव केला, तरीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता आमदार कांबळे यांच्यासह सर्वांना धक्काबुक्की करण्यात आली. हा सर्व प्रकार सुरू असताना पोलिस निरीक्षक संपत शिंदे उपस्थित होते. मात्र, त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. संतप्त कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.