अध्यक्षांनंतर मीच अफगाणिस्तानमध्ये लोकप्रीय! - राशिद खान


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माझ्या माहितीप्रमाणे अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनंतर मीच कदाचित अधिक लोकप्रीय असेन, असे अकराव्या आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या राशिद खानला वाटते.एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलचा उपविजेता ठरलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाच्या राशिद खानने सांगितले की, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या क्वालिफायर दोनच्या सामन्यात मी १९ धावांत केकेआरचे तीन प्रमुख फलंदाज बाद केले आणि त्यामुळेच आमच्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. 

त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माझ्या कामगिरीची प्रशंसा करताना ट्विट केले की, मी क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. माझ्या मित्राने, मी बसमध्ये चढत असताना त्या ट्विटचा स्क्रीनशॉट पाठवला. ते पाहून मी थक्कच झालो. सचिन तेंडुलकर सारख्या श्रेष्ठ खेळाडूने दिलेल्या प्रमाणपत्रावर मी पुढील तास-दोन तास विचार करत होतो. त्या कौतुकाने माझ्यासारख्या होतकरू खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळाली.

आयपीएलमध्ये राशिद खानने आपल्या फिरकीवर विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनी सारख्या मान्यवर फलंदाजांना बाद केले. त्याच्या दृष्टीने ती समाधान देणारी कामगिरी होती. ट्वेण्टी-२० क्रिकेट म्हणजे गोलंदाजांची पिटाई, असे म्हटले जाते; पण राशिद खानचे मत मात्र वेगळे आहे. याविषयी तो म्हणतो, एखादा फलंदाज जरी तुमची गोलंदाजी चोपून काढत असेल, तर संयम सोडू नये आणि स्वत:वरील आत्मविश्वास गमावता कामा नये.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.