घरांवर विद्युत तारा पडल्याने लागलेल्या आगीत १४ शेळ्यांचा होरपळून मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोल्हार येथे महावितरणच्या विद्युत तारा घर व छप्परांवर पडल्याने लागलेल्या आगीत दोन पर्त्यांचे राहते घर, दोन छप्पर व १४ शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हार-राजुरी रस्त्यावर तीनचारी येथे फकीरा कारभारी खाटेकर व लखन सोन्याबापू शिंदे हे राहतात. काल दुपारी साडे अकराच्या सुमारास अचानक त्यांच्या घरावरील तारा छपरांवर कोसळल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सदर तारांचे घर्षण होऊन त्याचे लोळ छप्परावर पडल्याने त्यावर असलेल्या पाचटाने पेट घेतला.

सदर आगीत १४ शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्याच सोबत दोन पर्त्यांचे राहते घर व दोन छप्पर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्मसात झाले. त्यामुळे घरातील सर्व संसार उपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाली.. आग लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने चारीला पाणी असल्याने मिळेल त्या भांड्याने पाण्याचे फवारे मारून शेकडो नागरिकांनी आग विझविली.

मात्र वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. तरीही नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. मात्र दरम्यानच्या कळात घरातील अन्नधान्य, सायकल,भांडे आगीमध्ये जळून खाक झाले. खाटेकर यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी गाय विकून मिळालेले तब्बल ६० हजार रुपयांच्या नोटांची सुद्धा या आगीत राख झाली. सदर आग हि येथील विद्युत तारांमुळे लागली असल्याचे स्थानिक नागरिक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या आगीमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.