आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत ३ कोटींचा गंडा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुंबई येथील नामांकित रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीने नगरमध्ये आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून नगर व संगमनेर येथील गुंतवणूकदारांची ३ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात कंपनीच्या अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी संगमनेरच्या प्रबोध वसंत शिंदीकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरमध्ये रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीचे नगर-पुणे महामार्गावरील अक्षता गार्डनसमोर कार्यालय होते. या कंपनीत एजंटांमार्फत हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक डिसेंबर २०१५ ते २८ मे २०१८ या कालावधीत केली असून ठेवींच्या मुदती संपूनही पैसे मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने तसेच काहींचे दिलेले चेकही न वटताच परत आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. 

याप्रकरणी प्रबोध वसंत शिंदीकर यांनी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश वसंतकुमार गोयंका, मार्केटींग डायरेक्टर एन. एस. कोटनीस, प्रॉडक्शन डायरेक्टर बी. नटराजन, व्यवस्थापन डायरेक्टर प्रकाश उल्लेकर, मिराह ग्रुपचे एम.डी. गौरव गोयेकर, उमेश वर्तक व जितू बिटलानी (सर्व रा. मुंबई) या सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.