श्रीगोंद्याला पावसाचा तडाखा,वादळाने कोटयवधी रुपयांचे नुकसान


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्याला दि.२८ मे रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपून काढले. अनेक गावांत घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी पॉलिहाऊसचे नुकसान झाले. पावसाने कांदाही भिज़ला आहे. वादळात घरावरील पत्रे उडाल्याने आठ ते दहाज़ण ज़खमी झाले असून, काही ठिकाणी ज़नावरेही दगवाली आहेत. 

तालुक्यात या वादळाने कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज़ व्यक्त होत आहे. या वादळाचा सर्वात जास्त तडाखा चांडगाव गावाला बसला आहे. येथे वादळाने घरावरील पत्रे उडाल्यामुळे आठ ते दहाजण जखमी झाले आहेत. यात महिला, वृद्ध, व लहान मुलांचा समावेश आहे. 

वादळात प्रकाश दादा घोडके (पोलीस पाटील), संभाजी दत्तू चव्हाण, मोहन शंकर चव्हाण, सुभद्रा रामदास चाकणे, वैशाली संभाजी चव्हाण, गयाबाई दशरथ चव्हाण हे रात्रीच्या वादळात पत्रे उडू लागल्यामुळे जखमी झाले आहेत. .

तसेच वादळामुळे या गावातील ४० घरांची पडझड झाली. तर ज़नावरांच्या दहा गोठयांचे छत कोसळले असून, मोलमजुरी करणाऱ्या सात -आठ लोकांचे तर संपूर्ण घरेच नेस्तानाबूत झाली आहेत. वादळामुळे चांडगाव येथे घरातील जीवनावश्यक वस्तू वादळात धुळीस मिळाल्यामुळे गरिबांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. 

याच गावातील कैलास घोडके यांच्या गाभण गाईच्या पोटात घराचा पत्रा घुसल्यामुळे जागीच ठार झाली. तर गोठ्याचे छत अंगावर कोसल्यामुळे पाच ते सहा मेंढया दगावल्या आहेत. तालुक्यातील पारगाव, सुरोडी, वडाळी, आढळगाव, तांदळी, हिरडगाव, काष्टी, घारगाव, शेडगाव, टाकळी कडेवळीत या गावांनादेखील वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने डाळिंब, लिंबू या फळपिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच चिखलठणवाडी, कणसेवाडी या भागातील पॉलिहाऊस वादळाने उडून गेल्यामुळे त्यातील पिकांचे नुकसान झाले. 

काही ठिकाणी शेळयाही दगावल्या आहेत. वखारीत साठवून ठेवलेला कांदादेखील भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळात कोटयवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज़ व्यक्त होत आहे. श्रीगोंदा शहरासह अनेक भागात रस्त्यावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता तसेच अनेक भागात विजेचे खांब कोलमडले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

तो सुरळीत होण्यासाठी अजून दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेनंतर चांडगाव येथील माजी पं. स. सदस्य राजेंद्र म्हस्के, रवींद्र म्हस्के, सरपंच मनीषा रवींद्र म्हस्के यांनी संपूर्ण गावात फिरून नुकसान झालेल्या घरांची, पिकांची पाहणी करून या लोकांना धीर दिला. 

तसेच शासकीय यंत्रणेलादेखील याबाबत माहिती दिली; परंतु तहसीलदार महेंद्र महाजन हे कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी नायब तहसीलदार, सर्कल व तलाठयांना याठिकाणी पाठवले. अतोनात नुकसान होऊनसुद्धा पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा वेळेवर न पोहचल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तालुक्याला प्रथमच एवढया मोठ्या स्वरुपात वादळाचा फटका बसल्याचे ज़ाणकार सांगतात.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.