घरगुती भांडणातून भावाच्या मदतीने नवऱ्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरगुती भांडणातून पत्नीने भावाच्या मदतीने चक्क नवऱ्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नगर तालुक्यातील पांगरमल येथे २६ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबेनांदूर, ता. शेवगाव) असे विष पाजलेल्या पतीचे नाव आहे. 

याप्रकरणी गर्जे यांच्या फिर्यादीवरून पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांच्यासह चौघांविरोधात एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गर्जे व त्यांची पत्नी लिलाबाई यांच्या मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होते.

त्यामुळे लिलाबाई पांगरमल (ता. नगर) येथे त्यांच्या माहेरी आल्या होत्या. दरम्यान, गर्जे हे लिलाबाई यांना घेण्यासाठी पांगरमल येथे आले होते. पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास यांनी घरगुती भांडणाच्या रागातून गर्जे यांना खाली पाडून त्यांच्या तोंडात रोगर या विषारी द्रव्याची बाटली ओतली.त्यानंतर गर्जे यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

एमआयडीसी पोलिसांनी गर्जे यांचा जबाब नोंदवून घेत त्यांच्या फिर्यादीवरुन पत्नी लिलाबाई, सासरे हरिभाऊ आव्हाड, सासू सुमनबाई आव्हाड, मेव्हुणा चंद्रहास आव्हाड (सर्व रा. पांगरमल, ता. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विष पाजलेल्या गर्जे यांची वैद्यकीय चाचणी केली. चौकशीत त्यांना पत्नी व मेव्हुणा यांनी विष पाजल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.