कर्जतमध्ये व्यापाऱ्याचा खून प्रकरणी एका आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : मुंबई येथील फळ व्यापाऱ्याने विकत घेतलेले ट्रकभर टरबूज परस्पर विकण्याच्या इराद्याने व्यापाऱ्याचा दोरीने गळा आवळून खून करून तो मृतदेह खेड येथील भीमा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

याबाबत मयत व्यापारी हसन उमर शेख वय-५० याची पत्नी जैबून हसन शेख वय-४५ वर्षे रा.न्यू कलेक्टर कंपाउंड, मुंबई यांच्या फिर्यादीवरून मोहन कुंडलिक भोरे रा. कवडगाव, ता. जामखेड याला अटक केली असून, त्याचे इतर दोन साथीदार पसार झाले आहेत. 

याबाबत कर्जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- मयत व्यापारी हसन उमर शेख यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हसन हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मुंबई येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून फळे खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. दि. १९ मे रोजी ते बीडला गेले. दि. २४ रोजी त्यांनी मला फोनवरून परळी येथील शेतकऱ्याकडून टरबूज खरेदी केले असून, माल खरेदीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यास सांगितले. 

त्यानुसार मी एक लाख दहा हजार रुपये खात्यावर टाकले. दि. २६ रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत ट्रक न आल्याने आष्टी पोलिसांकडे पती हरवल्याल्याची फिर्याद दिली. त्यानंतर कर्जत तालुक्यात एक मृतदेह आढळल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली. 

मी शासकीय रुग्णालयात येऊन ते पहिले असता, माझ्या पतीचा तो मृतहे असल्याची खात्री पटली. त्यांच्या गळ्यावर दोरीने आवळ्याच्या खुणा दिसल्या. दि. २५ मेच्या रात्री माझ्या पतीचा ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खेडनदी पात्रात टाकला.या फिर्यादी वरून कर्जत पोलिसांनी चालक मोहन भोरे यास अटक करून त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.