दूध व शेतीमालाच्या रास्त दरासाठी अकोल्यात रास्तारोको


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दुधाला चांगला दर मिळावा व शेतीमालाला दीडपट भावाची हमी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी रविवारी (दि. २५) अकोले तालुक्यातील कळस येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला छावा वॉरियर्स संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या या रास्ता रोकोसाठी कळस व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 'लुटता कशाला फुकटच न्या' म्हणत राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनानंतरही दुधाचे भाव न वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो आहे. रास्ता रोकोच्या निमित्ताने शेतकऱ्यांमधील या संतापाची दखल सरकारने घ्यावी, अशी भावना यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध दर प्रश्नी एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे. राज्यभर होणाऱ्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने दूध उत्पादक सामील होतील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

संघर्ष समितीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने दूध दर वाढावेत यासाठी दूध पावडर बनविण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे तीन रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या उपायामुळे पावडर उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल असे सरकारला वाटते आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदान जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही दूध दरात काडीचाही फरक पडलेला नाही. अशा परिस्थितीत संघर्षाशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग शिल्लक नसल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.