वाळूतस्करांची दहशत, ग्रामस्थासह कोतवालाला पकडून ठेवत डंपर पळवला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर गोदावरी नदीपात्रातून वाळूचोरी करताना पकडलेला डंपर तस्करांनी पळवला. डंपर पळवताना माहिती पुरवणाऱ्या एका ग्रामस्थासह कोतवालाला तस्करांनी पकडून ठेवले. गोदावरीपात्रात सराला हद्दीत शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. 

तलाठी हेमंत श्यामराव डहाळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गौण खनिज चोरी, महसूल बुडवणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. गुड्डू यादव, सनी बोरूडे, सर्फराज (पूर्ण नाव माहिती नाही), डंपर क्रमांक एमएच ०४ ए सीजी ८७९७ वरील चालक व इतर दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

तहसीलदार सुभाष दळवी यांना गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांना वाळूतस्करी थांबवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. कोतवाल संदीप नवसरे यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने सकाळी सातच्या सुमारास नदीपात्रातून वाळू चोरून नेणारा डंपर पकडला. त्यांनी ही माहिती तलाठी डहाळे व तहसीलदारांना दिली. 

ते तातडीने सराला गावाकडे निघाले. मात्र, ते तेथे पोहोचण्यापूर्वी आरोपींनी डंपर पळवला. तहसीलदारांनी तालुका पोलिस ठाण्यात जाऊन रितसर फिर्याद दिली. दरम्यान, ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपर पळवताना उपस्थित एका ग्रामस्थाला व कोतवाल नवसरे यांना पकडून ठेवण्यात आले होते. तथापि, ग्रामस्थ जीवाच्या भितीने पुढे येण्यास तयार झाले नाहीत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.