महापौर कदम शहराचा विकास नाही, तर भकास करायला निघाले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापौर सुरेखा कदम व नगरसेविका शारदा ढवण यांच्यातील वाद थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. शारदा ढवण यांनी पत्र काढून महापौर सुरेखा कदम व त्यांचे पती माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यावर थेट आरोप केले आहे. महापौर कदम यांची कार्यशैली म्हणजे शहराचा विकास नाही, तर भकास करायला निघाले आहे, अशी टीका ढवण यांनी पत्रकातून केली आहे.

नगरसेविका शारदा ढवण व त्यांचे पती दिगंबर ढवण यांनी सावेडी कचरा डेपोतील आग प्रश्नांवरून केलेले आंदोलन सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. दिगंबर ढवण यांनी पक्षशिस्त भंग केली म्हणून, त्यांची उपजिल्हाप्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.

ढवण यांनी पत्रकात महापौर कदम व त्यांचे पतीराज यांना टार्गेट केले आहे. महापौर कदम यांची कार्यशैली म्हणजे शहर भकास करणारी आहे. अकार्यक्षम आहे. गेली दहा वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी महापालिकेत आम्हीच आंदोलने केली. त्यावेळी शिवसेनेच्या एकाही नगरसेवकांनी आंदोलने केली नाहीत. 

राष्ट्रवादी व काँग्रेसपुढे त्यावेळी सर्वांनीच नांग्या टाकल्या होत्या. जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावेळी पक्षाने फक्त बघ्याची भूमिका घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आम्ही आजही विसरलो नाही. त्यामुळे जनतेच्या कामांसाठी आजही आमचा संघर्ष सुरू आहे, असेही ढवण यांनी पत्रकात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.