माझ्या नादाला लागू नका - ॲड. प्रताप ढाकणे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक करुन एक कोटी, चौदा लाख रुपयांचा नफा कमावला आहे. वृद्धेश्वर कारखाना व खरेदी- विक्री संघात काय चाललयं ते पहा. आमचा नाद करू नका, असा इशाराकेदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिला आहे.
शनिवारी प्रताप ढाकणे यांनी नवीपेठीतील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी ढाकणे म्हणाले, बाजार समितीच्या भूखंडाबाबत विरोधक आरोप करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात बैठा सत्याग्रह केला. त्यांना आमदारांनी हे आंदोलन करायला लावले, ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच मला फोन करून सांगितले. 

वृद्धेश्वर कारखाना थकित कर्जाने अडचणीत सापडला. सोयऱ्या -धायऱ्यांच्या पाया पडून पंचवीस कोटीचे कर्ज घेतले व कारखाना सुरू केला. अनेक कारखाने विकले गेले, मी राजकीय व प्रापंचिक किंमत मोजली, पण कारखाना विकला नाही. सहकारी संस्था चालविण्याचे मला समजते. सर्व संस्था तुमच्याच ताब्यात असाव्यात, तुमचं राजकारण टिकलं पाहिजे, संस्था सपंल्या तरी चालतील, असा अट्टाहास कशासाठी? 

खरेदी- विक्री संघात ५२ लाख रुपयांची अनियमितता आढळली. त्याबाबत गुन्हा दाखल का केला जात नाही, तुम्ही आमदार आहात म्हणून दबाव आणता का, आम्ही बुधवारी (ता.३०) तारखेला सहाय्यक निबंधक कार्यालयमोर बैठा सत्याग्रह करणार आहोत. तिसगावचे बाजार समितीचे गाळे कोणालाही दिलेले नाहीत.

एक गाळा नियमानुसार अनामत रक्कम घेऊन दिलेला आहे. मग भ्रष्टाचार झाला कुठे, बदनाम करू नका. बाजार समितीने एक कोटीचा नफा कमावला आहे. माझ्या नादाला लागू नका अन्यथा तुमच्या बुडाखालचा अंधार उजेडात येईल, असा इशारा ढाकणे यांनी दिला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.