सोमवारपासून सीना नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सीना नदीचे पात्र मोकळे व्हावे आणि नदीपात्रात झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी येत्या सोमवारपासून धडक मोहीम सुरु करण्यात येणार असून जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी या मोहिमेसाठी त्यांना देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात श्री. द्विवेदी यांनी नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याच्या कामांसंदर्भात विविध यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्यासह भूमी अभिलेख, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सीना नदीपात्र अतिक्रमणामुळे तसेच गाळ आणि झाडा-झुडुपांनी वेढले गेले आहे. येत्या पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, नदीपात्रातील प्रवाह इतरत्र वळू नये, यासाठी नदीपात्र खुला करुन प्रवाही करणे, नदीपात्रालगत झालेली अतिक्रमणे हटवणे यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात, सर्व तयारी पूर्ण झाली असून सोमवारपासून नदीपात्र स्वच्छता मोहिम आणि अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेसाठी उपलब्ध होणारे पोकलेन, डंपर्स आदींचा त्यांनी आढावा घेऊन कशाप्रकारे मोहिम राबवावी, याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. नदीपात्र आणि लगतच्या भागाच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेवेळी उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नदीपात्रातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात, तहसीलदारांनी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नदी स्वच्छता व अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. एखाद्या नागरिकांचे काही म्हणणे असेल तर ते ऐकून संबंधित विभागाने त्या नागरिकांचे शंका निरसन करावे. मात्र, कायद्याची प्रक्रिया काटेकोरपणे पाळून ही मोहिम राबवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. सुरुवातीच्या टप्प्यात तीन ठिकाणाहून ही मोहिम सुरु होणार आहे. त्यासाठी महापालिकेची तीन पथके असणार असून प्रत्येक पथकात महसूल, मोजणी विभाग, महापालिका यांचा एक अधिकारी व एक कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. याशिवाय, प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे प्रत्येकी 10 कर्मचारी असणार आहेत. या तीनही ठिकाणी पोलीसांची पुरेशी कुमक राहणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.